वनराई फुलल्याने वन्यजीवांचे होतेय संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:23+5:302021-06-05T04:15:23+5:30
अहमदपूर वनपरिक्षेत्रात २६५५.७७ एकर जमीन असून त्यात अहमदपूर, चाकूर, जळकोट व उदगीर तालुक्याचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ८५५ ...

वनराई फुलल्याने वन्यजीवांचे होतेय संरक्षण
अहमदपूर वनपरिक्षेत्रात २६५५.७७ एकर जमीन असून त्यात अहमदपूर, चाकूर, जळकोट व उदगीर तालुक्याचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ८५५ हेक्टर जमीन असून त्यावर वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात घनवट, मियावाकी पध्दत असून वड, पिंपळ, गुलमोहर, लिंब, बांबू अशा रोपांचा समावेश आहे. घनवनात विविध वन्यजीव आसरा घेत आहेत. त्यात लांडगा, कोल्हा, उदमांजर, रानमांजर, घोरपड, हरीण, मोर, रानडुकर तसेच पक्ष्यांमध्ये माळटिटवी, नीलपंख, साप, गरुड, घुबड अशा पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. कृत्रिम पाणवठ्यांमुळे विविध पक्षी व प्राणी येत आहेत.
वनपरिक्षेत्राच्यावतीने जैवविविधता जोपासली जात असून एकाच ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष, प्राणी व पक्ष्यांचा अधिवास पहायला मिळतो. यंदाही शिल्लक राहिलेल्या जागेवर वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला असून मागील तीन वर्षात लावण्यात आलेल्या झाडांची संवर्धनाची टक्केवारी ८० पेक्षा जास्त आहे. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धन व संरक्षण केले जाते. उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी टाकून झाडे जगविली जात आहेत. हरित वसुंधरेचा संकल्प घेऊन पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभाग व्हावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्रात जैवविविधता...
अहमदपूरसारख्या डोंगराळ भागात अनेक प्रकारचे वृक्ष घन व मियावाकी पद्धतीने लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी वृक्षाबरोबर पक्षी व प्राण्यांचा अधिवास पहायला मिळतो, असे वन परिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड...
वन विभागाच्या वतीने शासकीय जमिनीबरोबरच शेतकऱ्यांच्या बांधावर बांबू लागवडीसाठी रोपे व अनुदान योजना सुरु असून त्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वनपाल एस.एम. कोम्पलवार यांनी सांगितले.