बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST2021-05-25T04:22:30+5:302021-05-25T04:22:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीची परीक्षा कधी होईल, याबाबत अद्यापही ...

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीची परीक्षा कधी होईल, याबाबत अद्यापही निर्णय नाही. संचारबंदीमुळे महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थी नियमित अभ्यास करीत असून, परीक्षेवर पर्याय काय राहील. याबाबत शासन स्तरावर विचार सुरू असला तरी परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात विद्यार्थी आहेत.
जिल्ह्यात बारावीचे ३४ हजार ५३९ विद्यार्थी आहेत. यामध्ये १८ हजार २०० मुले तर १६ हजार ३४१ मुली आहेत. कोरोनामुळे काही दिवस ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता. मध्यंतरी ऑफलाईन वर्ग सुरू झाले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महाविद्यालये बंद करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी बारावीचा अभ्यास करीत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये होणारी परीक्षा मे महिना संपत आला तरी झालेली नाही. शासनस्तरावर बारावीच्या परीक्षेबाबत विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे परीक्षेवर काय पर्याय निघतो, याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज पालक, विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
काय असू शकतो पर्याय
सध्या कोरोनाची परिस्थिती कमी होत आहे. मात्र ऑफलाईन परीक्षा घेणे जिकरीचे ठरू शकते. नीटच्या धर्तीवर विषयनिहाय २०० मार्कांची परीक्षा घेतल्यास निकाल देणे सुलभ होईल. या बाबीचा विचार होणे गरजेचे आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे
मे महिना संपत आला तरी बारावी परीक्षेबाबत निर्णय झालेला नाही. ऑफलाईन परीक्षा झाल्या तरी निकाल लागण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा हाच एकमेव पर्याय आहे. याबाबत सकारात्मक विचार व्हावा. - प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे
विद्यार्थी संभ्रमात
गेल्या वर्षभरापासून बारावी परीक्षेची तयारी करीत आहेत. परीक्षा तारीख जाहीर नसल्याने मनात संभ्रम आहे. ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य असेल तर ऑनलाईन परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा. - प्रणव बिडवे, विद्यार्थी
दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये लेखी परीक्षा होत असते. यावर्षी अजूनही परीक्षा झालेली नाही. ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी लागणार, पुढील प्रवेश कसे घेणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घ्यावी. - अमेय कुलकर्णी, विद्यार्थी
कोरोनामुळे वर्ग नियमित झालेले नाहीत. घरीच अभ्यास करतोय. परीक्षेची तारीखही जाहीर झालेली नाही. तात्काळ परीक्षेची तारीख जाहीर करावी. अन्यथा ऑफलाईनचा पर्याय अवलंबवावा. - शिवम बुरांडे, विद्यार्थी.
बारावीचे विद्यार्थी ३४५३९
मुले १८२००
मुली १६३३९