२० गावांत पाणीटंचाई वाढली, अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:04+5:302021-05-01T04:18:04+5:30
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जलसाठे आटू लागले आहेत तर विहिरी, कूपनलिकांचे पाणी कमी होऊ लागले आहे. गेल्या ...

२० गावांत पाणीटंचाई वाढली, अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रलंबित
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जलसाठे आटू लागले आहेत तर विहिरी, कूपनलिकांचे पाणी कमी होऊ लागले आहे. गेल्या पावसाळ्यात तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती. परंतु, आता वाढत्या उन्हामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
अहमदपूर तालुक्यातील १२३ गावांपैकी २० गावांत पाणीटंचाईचे चटके जाणवू लागल्याने सदरील गावांनी अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने हे प्रस्ताव उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले आहे. मात्र अद्यापही त्यास मंजुरी मिळाली नाही.
तालुक्यातील वैरागड, गादेवाडी, काळेगाव, नरवटवाडी, कोकणगाव, विळेगाव, खंडाळी, जांब, माकणी, भुतेकरवाडी, अजनी खु., थावरा तांडा, चिलगरवाडी, टाकळगाव (का.), नांदुरा या गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील बोरवेल व विहिरी अधिगृहित करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे पाठविले आहेत.
मंजुरीनंतर अधिग्रहण...
सदरील २० गावांतील पाणीटंचाई संदर्भातील प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर केले आहेत. ते मंजुरीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. मंजुरी मिळताच अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे पाणीटंचाई विभागाचे संजय पवार यांनी सांगितले.
स्थळ पाहणीनंतर मंजुरी...
तालुक्यातून दाखल झालेले अधिग्रहणाचे सर्व प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीसाठी जिल्हापातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यांची परवानगी मिळताच विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. तसेच टँकरविषयी अहमदपूर शहर वगळता कुठलाही प्रस्ताव नसल्याचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी सांगितले.