वांजरवाडा, अतनूर, घोणसी ग्रामपंचायतींसाठी होणार चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:49+5:302020-12-29T04:18:49+5:30
जळकोट : तालुक्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या वांजरवाडा, अतनूर, घोणसी येथील ग्रामपंचायतींची निवडणूक ही रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता दिसून ...

वांजरवाडा, अतनूर, घोणसी ग्रामपंचायतींसाठी होणार चुरस
जळकोट : तालुक्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या वांजरवाडा, अतनूर, घोणसी येथील ग्रामपंचायतींची निवडणूक ही रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता दिसून येत आहे. गावची सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तालुक्यातील घोणसी, वांजरवाडा, अतनूर येथील ग्रामपंचायतींची सदस्य संख्या प्रत्येकी ११ अशी आहे. तालुक्यात सर्वांत मोठ्या या ग्रामपंचायती असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच तालुक्यातील रावणकोळा, तिरुका, मरसांगवी, गव्हाण, धामनगाव, कोळनूर, सोनवळा, कुणका या ८ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या प्रत्येकी ९ आहे. या ग्रामपंचायतींत दुरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर हळद वाढवणा, पाटोदा खु., डोंगरगाव, येलदरा, चिंचोली, सुल्लाळी, एकुर्का खु., बोरगाव खु., विराळ, शेलदरा, वडगाव, वळसांगवी, डोंगरकोनाळी, लाळी बु., मेवापूर, शिवाजीनगर तांडा या १६ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या ७ अशी आहे. छोट्या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यास गावच्या विकासात आणखी भर पडणार आहे. तालुक्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.
महाविकास आघाडी झाल्यास चित्र बदलणार...
तालुक्यात काँग्रेस आणि भाजपाचे वर्चस्व आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीची सत्ता आहे. दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तालुक्यातील विकासकामांवर भर दिला आहे. त्याचा या निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी निर्माण झाल्यास भाजपाला कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
राजकीय मंडळींकडून चाचपणी...
भाजपाचे माजी आमदार तथा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आ. गोविंद केंद्रे, नागनाथ निडवदे, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी तालुक्यात चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काँग्रेसचे मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे संगम टाले यांच्यात खलबते सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरात कामास लागले आहेत.
२१७ सदस्यांची होणार निवड...
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी २१७ सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठी ३३ हजार ७०९ मतदार मतदान करणार आहेत. त्यात १७ हजार ८७० पुरुष, तर १५ हजार ८३९ महिला मतदार आहेत. एकूण ८४ प्रभाग असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.