लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरासह जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४३ हजार २३१ वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ५७ लाख ५१ हजार ३०१ रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
२०२० मध्ये ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४ हजार ६७३ वाहनधारकांकडून ९ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनाहेल्मेट ८६७ वाहनांवर ४ लाख ३३ हजार ५००, नो पार्किंगमध्ये थांबविलेल्या ८ हजार ६४ वाहनांना १६ लाख १२ हजार ८००, मोबाइलवर बोलणाऱ्या ३ हजार १२६ जणांना ६ लाख २५ हजार २०० रुपयांचा दंड केला आहे. तर फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या १ हजार १५४ वाहनधारकांना १ लाख ९ हजार २०० तर विनालायसन फिरणाऱ्या १३ हजार ५३४ वाहनधारकांकडून ६७ लाख ६७ हजारांचा दंड वसूल केला आहे.
विनालायसन सर्वाधिक दंड वसूल
कोरोनाकाळात रस्त्यावर वावरणाऱ्या वाहनधारकांत विनालायसन वाहन चालविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. २०२० मध्ये १३ हजार ५३४ वाहनधारकांकडून ६७ लाख ६७ हजार तर मे २०२१ अखेर ३ हजार ९०६ वाहनचालकांकडून ७ लाख ८१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लातूर शहरात सर्वाधिक कारवाया
मार्च २०२० ते मे २०२१ या कोरोनाकाळात लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, विवेकानंद चौक आणि लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ उदगीर आणि अहमदपूरचा क्रम लागतो. विनाकारण रस्त्यावर फिरणे, विनामास्क फिरणे, विनालायसन आणि इतर कागदपत्रे नसणे हे अनेक वाहनधारकांना अंगलट आले आहे.
कोरोनाकाळात नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. जाहीर करण्यात आलेले नियम आणि निर्बंध वाहनधारकांकडून पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. अशा वाहनधारकांना पोलीस प्रशासनाकडून कारवाईबरोबर दंड करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर