चापोलीच्या ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले चोरट्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:42+5:302020-12-29T04:18:42+5:30
चापोली येथील माजी सैनिक भाऊसाहेब होनराव यांच्या घरी शुक्रवारी रात्री १०.३५ वा. च्या सुमारास एका चोरट्याने प्रवेश केला. चोरी ...

चापोलीच्या ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले चोरट्यास
चापोली येथील माजी सैनिक भाऊसाहेब होनराव यांच्या घरी शुक्रवारी रात्री १०.३५ वा. च्या सुमारास एका चोरट्याने प्रवेश केला. चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याची संगमेश्वर होनराव, दीपक होनराव यांना चाहुल लागली. तेव्हा त्या दोघांनी चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे चोरट्याने तेथून पळ काढला. दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक जागे झाले व त्यांनी पळ काढलेल्या चोरट्याचा तब्बल २ किमी पाठलाग करुन गावकुसाबाहेर पकडले. दरम्यान, ग्रामस्थांनी चाकूर ठाण्याला माहिती दिली. पोलीस येताच चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीसांनी चोरट्याकडील एक स्टिलची कात्री, स्टिलचा रॉड, ब्लेड, चाकू जप्त केला.
यांबाबत चाकूर पोलीस ठाण्यात संगमेश्वर होनराव यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश विनायक शिंदे (रा. सलगरा, ता. अहमदपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. सूर्यवंशी हे करीत आहेत.