पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीनेही सोडला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:14+5:302021-07-16T04:15:14+5:30
कासार बालकुंदा (जि. लातूर) : ४७ वर्षांपासून एकमेकांना साथ देत संसार फुलविणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. ...

पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीनेही सोडला प्राण
कासार बालकुंदा (जि. लातूर) : ४७ वर्षांपासून एकमेकांना साथ देत संसार फुलविणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. हा विरह सहन न झाल्याने आक्रोश करीत असलेल्या पत्नीसही हृदयविकाराचा धक्का आल्याने तिनेही अखेरचा श्वास घेतल्याची घटना निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे घडली आहे. एकाच दिवशी मृत्यू झालेल्या आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मुलांवर आली आहे.
सिद्रामप्पा ईटले (७२) व ललिताबाई ईटले (६८, रा. उस्तुरी, ता. निलंगा) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. सिद्रामप्पा व ललिता यांचा जवळपास ४७ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना वडिलोपार्जित ८ एकर शेती असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. कुठल्याही कठीण प्रसंगात एकमेकांशी सल्लामसलत करून एकमुखी निर्णय घेत असत. संसारात त्यांनी अनेक चढ-उताराचे प्रसंग अनुभवले. मात्र, आनंदाने सुखी संसार केला. त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर ४ मुले झाली. गाव आडवळणाला असतानाही आपली मुले शिकली पाहिजेत, असा दोघांचाही अट्टहास असे. त्यामुळे त्यांनी मुलांना शिकविण्याचा प्रयत्न केला. थोरल्या मुलाने पीएच.डी. पूर्ण केल्याने प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्यानंतरची दोन्ही मुले काही प्रमाणात शिकली असली तरी शेतीकडे वळली. तर सर्वात धाकटा मुलगा मुंबईत कंपनीत काम करीत आहे. मुले उपवर झाल्याने त्यांचे शुभमंगलही केले.
गुरुवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास सिद्रामप्पा हे चहा घेत होते. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि जमिनीवर कोसळले. कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावून आणून तपासणी केली असता त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. दरम्यान, पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच ललिताबाई या आक्रोश करू लागल्या आणि त्यात त्यांनाही हृदयविकाराचा धक्का बसला. काही क्षणातच त्यांनीही प्राण सोडला. पती-पत्नीच्या निधनाची वार्ता गावात समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिक्षणासाठी शेतीविक्रीचा निर्णय...
मध्यंतरीच्या कालावधीत मोठ्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी त्यांनी शेतीविक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे थोरला मुलगा सेट-नेट उत्तीर्ण होत पीएच.डी. मिळविली. गावातील पीएच.डी.धारक पहिला विद्यार्थी तो आहे. दरम्यान, ६ जून रोजी सर्वात धाकट्या मुलाचे हात पिवळे केले.