अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा
By हरी मोकाशे | Updated: April 13, 2024 18:52 IST2024-04-13T18:47:01+5:302024-04-13T18:52:16+5:30
पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरु

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा
लातूर : गेल्या चार- पाच दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्याचा जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील आंबा, द्राक्षे, केळीच्या बागांसह रबी ज्वारीस फटका असला आहे. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे.
गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उन्हाळा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना केळी, द्राक्षे, आंब्याच्या फळबागा जोपासताना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या जलस्त्रोत कोरडे पडत आहेत तर विहिरींनी तळ गाळला आहे. शिवाय, कुपनलिका बंद पडत आहेत. त्यामुळे काही शेतकरी अन्य शेतकऱ्यांकडून विकत घेऊन पाणी बागा जगवित असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या चार- पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, जळकोट, देवणी, रेणापूर, लातूरसह अन्य तालुक्यांतील फळबागांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची काढणीस आलेली रबी ज्वारी भुईसपाट झाली आहे तर काही ठिकाणचा कडबा भिजला आहे.
भेटा येथे गारांचा पाऊस...
शनिवारी सकाळी लातुरात १० मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास औसा तालुक्यातील भेटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कडबा भिजला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी...
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे गुरुवारी औसा तालुक्यातील नांदुर्गा व परिसरातील केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली. या नुकसानीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव यांनी शनिवारी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेऊन नुकसानीनंतरच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच फळपीकविमा योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए.के. पिनाटे, कृषी सहाय्यक एम.जी. वाघमारे, तलाठी गहिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
हलका ते मध्यम पावसाची शक्यता...
शुक्रवारी रात्रीपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली जात आहे. हवामान विभागाने तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.
- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.