बस स्थानकात लालपरी चालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST2021-08-28T04:23:46+5:302021-08-28T04:23:46+5:30
लातूर : कोरोनाचे साखळदंड तोडत एसटी सुसाट धावत असून, दररोजच्या उत्पन्नात चांगली भर पडत आहे. प्रवाशांची संख्याही वाढली आहे, ...

बस स्थानकात लालपरी चालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप !
लातूर : कोरोनाचे साखळदंड तोडत एसटी सुसाट धावत असून, दररोजच्या उत्पन्नात चांगली भर पडत आहे. प्रवाशांची संख्याही वाढली आहे, त्यामुळे एसटी प्रशासनाच्या वतीने बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, बसस्थानकावरील ठरवून दिलेल्या फलाटवर बसेस थांबत नसून स्थानक परिसरात उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात बसेसची शोधाशोध करावी लागत आहे. चालकांच्या बेशिस्तीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लातूर शहरातील मध्यवर्ती स्थानकातून जिल्हांतर्गत तसेच इतर जिल्ह्यांसाठी काही बसेस धावतात. निश्चित स्थळी जाण्यासाठी प्रवासी स्थानकावर बसची वाट पाहतात. मात्र, बसेस फलाटवर न थांबता बसस्थानक परिसरातच उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम होत असून, प्रत्येक बसमधील प्रवाशांना बस कुठे जाणार आहे, अशी विचारणा करावी लागत असल्याचे चित्र आहे. लातूर शहरासोबतच ग्रामीण भागामध्येही हीच स्थिती आहे. बसस्थानक प्रशासनाच्यावतीने इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेससाठी फलाट उपलब्ध केले आहेत. मात्र, दुसरीकडेच बसेस उभ्या केेल्या जात असल्याने प्रवाशांमधुन नाराजी व्यक्त होत असून, याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे
बस दुसरीकडे उभी...
निलंग्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर गेलो होतो. फलाटवर निलंगा बस उभी राहील अशा अपेक्षा होती. मात्र, बसच न आल्याने स्थानक परिसरात पाहणी केली असता, बस दुसऱ्याच ठिकाणी उभी होती. बसमध्ये गर्दी असल्याने जागाही मिळाली नाही. याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. बालाजी जाधव, प्रवासी
नियोजन कोलमडले...
कोरोनामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे एसटी बसेसही सुरू झाल्या आहेत. मात्र, स्थानकावर बसेस इतर ठिकाणी उभ्या केल्या जात असल्याने प्रवासी फलाटवरच बसची वाट पाहतात. त्यामुळे गैरसोय होत आहे. बस फलाटवर थांबण्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. - ऋषिकेश महामुनी, प्रवासी
बस स्थानकात आल्यानंतर प्रवासी उतरतात. त्यानंतर पुढील मार्गावर बस जाणार असेल तर फलाटवर उभी करणे गरजेचे आहे. याबाबत आगारप्रमुख, कंट्रोलर यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही नियमांचे पालन केले जात नसेल तर यापुढे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक