उदगीर तालुक्यात उसाचे क्षेत्र चाैपट वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST2021-02-27T04:25:47+5:302021-02-27T04:25:47+5:30
उदगीर : तब्बल चार वर्षांनंतर पाऊस चांगला झाल्याने सर्व तलाव तुडुंब भरले. ऊस लागवडीसाठी जिल्हा बँकेकडून शून्य टक्के ...

उदगीर तालुक्यात उसाचे क्षेत्र चाैपट वाढले
उदगीर : तब्बल चार वर्षांनंतर पाऊस चांगला झाल्याने सर्व तलाव तुडुंब भरले. ऊस लागवडीसाठी जिल्हा बँकेकडून शून्य टक्के व्याजदराने अर्थसाहाय्य मिळत असल्यामुळे त्याचा फायदा घेत शेतक-यांनी ऊस लागवड केली आहे. चार वर्षांनंतर तलाव क्षेत्रात रेड बेल्टचे रूपांतर ग्रीन बेल्टमध्ये झाल्याचे दिसत आहे.
चार वर्षांनंतर तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सर्व पाझर तलाव, लघू, मध्यम प्रकल्प व शेतातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच भाजीपाला, फळबागा करून उसाची लागवड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा बँकेची बैठक घेऊन शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी शून्य टक्के व्याजदराने हेक्टरी अर्थसाहाय्य करण्याचे निर्देश बँकेच्या व विविध कार्यकारी संस्थेच्या गटसचिवांना दिले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऊस लागवड करीत आहेत. तालुक्यातील तलाव क्षेत्र भागात उसाचे क्षेत्र चारपटीने तर अन्य भागांत दुपटीने वाढले आहे. चार वर्षांपूर्वी पाऊस नसल्यामुळे व तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्यामुळे ग्रीन बेल्ट परिसर हा रेड बेल्ट झाला होता. आता हा परिसर पुन्हा ग्रीन बेल्ट तयार झाला आहे. जागृती साखर कारखान्याच्या करडखेल कार्यालयांतर्गत असलेल्या १७ गावांतून उसाची लागवड तिपटीने, तर उदगीर गटातून दुपटीने वाढली आहे.
दाेन हजार १५२ हेक्टरवर लागवड...
तालुक्यात गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र ५९८ हेक्टर होते. यंदा शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आतापर्यंत दोन हजार १५२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. अजून काही शेतकरी उसाची लागवड करीत आहेत. याशिवाय, भाजीपाला व फळबागा लागवडीच्या क्षेत्रातही दुपटीने वाढ झाली आहे.
- संजय नाबदे, तालुका कृषी अधिकारी
योग्य वीजबिल द्यावे... तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्पातील जलसाठा उदगीरसाठी आरक्षित करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले होते. चार वर्षांनंतर देवर्जन प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांनी वीजजोडणी करून सिंचन क्षेत्र पूर्ववत सुरू केले आहे. चार वर्षे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद असल्याने या कालावधीतील विजेचे बिल कमी करून देण्यात यावे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वीजबिलांच्या नोटीसनुसार वीजपुरवठा खंडित करू नये.
- बसवराज रोडगे, तालुकाध्यक्ष, भाजप
सोसायटीमार्फत कर्जवाटप...
शेतकऱ्यांना उसाची लागवड करण्यासाठी हेक्टरी दीड लाखांपासून तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तत्काळ शून्य टक्के व्याजदराने वाटप करावे, असे निर्देश माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्ह्यातील ५८६ संस्थेच्या गटसचिवांना दिले आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी संस्थेमार्फत कर्जवाटप सुरू आहे.
- राम बिरादार, जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना