राजकुमार जाेंधळे / लातूर : पुणे, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी पळविणाऱ्या टाेळीतील दाेघांना सात दुचाकींसह अटक केली आहे. यातील तिसरा पसार झाला आहे, तर चाैथा आराेपी अल्पवयीन आहे. चाैकशीत सहा गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ही कारवाई लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
लातूरसह जिल्ह्यात वाहन चाेरणाऱ्या टाेळीचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आराेपींचा शाेध सुरू केला. दरम्यान, २६ मे राेजी खबऱ्याने पाेलिसांना माहिती दिली. काही संशयित गरुड चौक, रिंग रोडनजीकच्या मोकळ्या जागेत थांबले असून, दुचाकी खरेदी - विक्रीचा व्यवहार करीत आहेत. या माहितीच्या पडताळणीनंतर पथकाने तातडीने गरुड चौक परिसर गाठला. बुलेटसह थांबलेल्या व्यक्तिंना ताब्यात घेत दुचाकींबाबत अधिक चाैकशी केली असता त्यांनी आपली नावे सुरज बाळासाहेब गायकवाड (वय २१, रा. मोगरा, ता. माजलगाव, जि. बीड), गणेश उर्फ संकेत सुरेश गंगात्रय (वय २४, रा. आडस, ता. केज, जि. बीड) असे सांगितले. त्यांचा इतर साथीदार अंकुश बाबासाहेब नागरगोजे (वय २३, रा. घागरवाडा, ता. धारूर, जि. बीड) हा पसार झाला आहे, तर चाैथा केज (जि. बीड) येथील अल्पवयीन आराेपी आहे. या चाैघांनी एकत्र येत लातूर, बीड, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सहा बुलेट आणि इतर एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आराेपींकडून सात दुचाकी (किंमत ५ लाख ९० हजार) जप्त केल्या आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. संजीवन मिरकले, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, विनोद चलवाड, राजेश कंचे, राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, जमीर शेख, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे तसेच सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.