उदगीरजवळ दुचाकी-ऑटोची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: June 26, 2023 18:59 IST2023-06-26T18:59:44+5:302023-06-26T18:59:56+5:30
या अपघातात चार जन जखमी झाले आहेत

उदगीरजवळ दुचाकी-ऑटोची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू
उदगीर : येथून जवळ असलेल्या हाकनकवाडी पाटीजवळ दुचाकी व ऑटोची समोरासमोर धडक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीचालक व ऑटोमधील एक महिला या दोघांचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत.
उदगीरकडून वाढवणाकडे जात असलेला प्रवासी ऑटो क्रमांक (एम.एच. २६ ए.सी. २५८२) व उदगीरकडे येत असलेली दुचाकी क्रमांक (एम.एच. २६ सी.सी. ८८७०) या दोन्ही वाहनांची हाकनवाडी पाटीजवळ सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक सुनील रामराव राठोड (वय २१ रा. गुंडोपत दापका, ता. मुखेड) व ऑटोमधील महिला प्रवासी आयोध्या बालाजी कदम (वय ४५ रा. तिपराळ ता. शिरुर अनंतपाळ) या दोघांचा मृत्यू झाला.
तर दुचाकीवरील राहुल प्रकाश राठोड, ऑटो मधील विष्णू कोंडीबा मस्के, शिवाजी विष्णू मस्के, मीना विष्णू मस्के व एक अनोळखी प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.