दोन हजार पालकांनी पुस्तके केली परत; आपण कधी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST2021-05-10T04:19:18+5:302021-05-10T04:19:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, ...

दोन हजार पालकांनी पुस्तके केली परत; आपण कधी करणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षी अभ्यासक्रम बदलत नसल्याने जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तक जतनाची गोडी लागावी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांना होण्यासाठी पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यातील दोन हजार पालकांनी पुस्तके परत केली आहेत.
२०२०-२१ शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या ३ लाख ४ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनामुळे प्राथमिक विभागाच्या शाळा वर्षभर उघडल्याच नाहीत, तर पाचवी ते आठवीच्या शाळा काही काळ उघडल्या व प्रत्यक्ष वर्ग भरले नाहीत. त्यामुळे पुस्तकांचा फारसा वापर झाला नसल्याने शिक्षण विभागाच्या वतीने पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी आवाहन करण्यात आले होते.
पाल्याला नीटनेटकेपणा मूल्याची जाणीव व्हावी यासाठी पुस्तकांची निगा ठेवण्याचे भान त्यांना दिले पाहिजे. यातून अनेक फायदे आहेत. तसेच समाधानही आहे. पुस्तके मोफत मिळत असली तरी विद्यार्थ्यांनी ती जपून वापरली पाहिजेत.
- विजय सोनवणे.
पर्यावरण संवर्धनाची विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आवड होणे गरजेचे आहे. पुस्तक पुनर्वापराच्या योजनेतून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागतील. सर्व पालकांनी आपल्या पाल्याची पुस्तके शाळेत जमा करायला हवीत. त्यामुळे चांगला संदेश जाईल.
- दत्ता धाकपाडे.
समग्र शिक्षा अभियानातून दिलेले पुस्तक संचन पुनर्वापरासाठी देण्याकरिता वर्षभर निगा ठेवावी लागते. पुस्तक परत देण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया, या भावनेतून पुस्तकांची निगा, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळेल.
- विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी.
पुस्तके परत केलेल्या २ हजार पालकांनी इतरही पालकांनी पुस्तके परत करण्यासाठी आवाहन केले आहे. लातूर जिल्ह्यात जवळपास जिल्हा परिषदेच्या १२०० हून अधिक शाळा आहेत, तर खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन्ही मिळून हजाराहून अधिक शाळा आहेत.
लातूर, औसा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, उदगीर, निलंगा, चाकूर, अहमदपूर तालुक्यातील पालकांना आवाहन केले आहे.