उदगीरनजिक वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू
By हरी मोकाशे | Updated: February 27, 2023 18:57 IST2023-02-27T18:57:28+5:302023-02-27T18:57:58+5:30
याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीरनजिक वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू
उदगीर (जि. लातूर) : शहरानजिक वेगवेगळ दोन अपघात झाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, रविवारी रात्री ८ वा.च्या सुमारास नांदेड रोडवरील हकनकवाडी पाटीजवळील पेट्रोल पंपासमोर दुचाकी (एमएच ०३, एई ८६३१) वरुन अंगद बाबुराव निलेवाड (३३, रा. अनुपवाडी, ता. उदगीर) हे जात होते. तेव्हा टिप्पर (एमएच ०४, जेयू ३७२०) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वारास समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात अंगद निलेवाड यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उमाकांत बाबुराव निलेवाड यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरुद्ध सोमवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा अपघात सोमवारी सकाळी शहरातील बिदररोडवरील उड्डाणपुलावर झाला. सकाळी ६.३० वा. च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी उत्तम गोविंदराव मोरे (५२, रा. शेल्हाळ, हमु. उदगीर) हे पायी जात होते. तेव्हा त्यांना पाठीमागून टिप्पर (एमएच २४, एबी ५००९) ने धडक दिली. या अपघातात उत्तम मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विवेकानंद मोरे यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरुद्ध सोमवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.