बारावीच्या निकालाचा पेच; महाविद्यालयांना बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:15+5:302021-07-02T04:14:15+5:30
लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले ...

बारावीच्या निकालाचा पेच; महाविद्यालयांना बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून अथवा विभागीय शिक्षण मंडळाकडून महाविद्यालयांना कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सध्या तरी ठप्प आहे. महाविद्यालयांना मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान या विद्या शाखांमध्ये दीड लाखांच्या पुढे विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना गुणदान करण्यासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष आहे. दहावी ४०, अकरावी ३० आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवर ३० टक्के गुण देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु, अधिकृतरित्या या संदर्भात शिक्षण मंडळाकडून कोणत्याही सूचना नाहीत. दहावीच्या निकालाबाबत जशा सूचना शाळांना मंडळाकडून पोहोचल्या आहेत, तशा सूचना बारावीचा निकाल करण्याबाबत नसल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालय, पालक प्रतीक्षेत आहेत.
दहावीला मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान
दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षांवरून मू्ल्यांकन करण्याची सूचना अमलात आली तर नुकसान होईल. दहावीला मेरिट असून, अकरावीला कमी गुण असल्यास नुकसान होईल, असा मतप्रवाह शिक्षकांचा आहे. परंतु, अद्याप यासंदर्भात सूचना नसल्याचे दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने यांनी सांगितले.
दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवरून मूल्यमापन करावे, हे ऐकिवात आहे. या संदर्भातला कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे प्रक्रिया बंद आहे. अकरावीच्या मुलांची मात्र ऑनलाईन चाचणी घेऊन बारावीच्या वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे, असे दयानंद कला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी सांगितले.
नवीन अभ्यासक्रमानुसार लातूर बोर्डांतर्गत ७७ हजार ७४९ बारावीतील विद्यार्थी संख्या आहे. यात लातूर जिल्ह्यात विज्ञान १३ हजार ८५८, कला ९ हजार ८४५, वाणिज्य ५ हजार १५५, व्होकेशनल २ हजार ४०९ असे एकूण ३१ हजार २६८ विद्यार्थी आहेत. नांदेड जिल्ह्यात विज्ञान १५ हजार ९३, कला १३ हजार ४८, वाणिज्य ३ हजार ७११, व्होकेशनल ७२२ असे एकूण ३२ हजार ५७४ विद्यार्थी आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान ५ हजार ९३१, कला ५ हजार २१९, वाणिज्य १ हजार ८४३, व्होकेशनल ९५९ असे एकूण १३ हजार ९५२ विद्यार्थी आहेत.
जुना अभ्यासक्रम
लातूर जिल्ह्यात विज्ञान शाखा ३२०, कला ७०९, वाणिज्य ८, व्होकेशनल १७७ असे एकूण १ हजार ३७६ विद्यार्थी.
नांदेड जिल्ह्यात विज्ञान ५४८, कला १ हजार ३७६, वाणिज्य ११५, व्होकेशनल ९५ असे एकूण २ हजार १३४ विद्यार्थी.
उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान २०८, कला ५१३, वाणिज्य १०१, व्होकेशनल ११९ असे एकूण ९४१ विद्यार्थी.