वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:49+5:302021-07-16T04:14:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : सध्या पावसाचे दिवस असून, वीज पडण्याच्या घटनादेखील वाढत आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची ...

वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : सध्या पावसाचे दिवस असून, वीज पडण्याच्या घटनादेखील वाढत आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. वीज कडाडताच मोबाईल बंद करणे गरजेचे असून, झाडांपासून दूर राहिल्यास विजेपासून संरक्षण होऊ शकते.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत वीज पडून २४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर ३०१ पशुधनांना वीज पडल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, सध्या शेतीची कामे सुरू असल्याने अनेकांचा वावर शेतातच असतो. त्यामुळे पाऊस सुरू असताना विजेपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
वीज पडून मृत्यू झाल्यास चार लाखांची मदत
वीज पडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत शासनाच्यावतीने केली जाते.
दुधाळ जनावरे ३० हजार, ओढकाम करणारी जनावरे २५ हजार, तर लहान जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्यास प्रत्येकी १६ हजार रुपयांची मदत केली जाते.
विजेपासून बचावासाठी पावसात झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच आपले वाहन विजेचे खांब व झाडापासून दूर ठेवून सावकाश चालवावे.
जिल्ह्यात चार ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा...
१. जिल्ह्यात औसा तालुक्यातील बुधोडा, खरोसा, चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ, उदगीर तालुक्यातील हेर या ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा आहे.
२. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्यावतीने याबाबत जनजागृती केली जात आहे. वीज कडाडताच मोबाईल बंद करावा. तसेच झाडापासून दूर राहावे.
३. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे पाऊस सुरू असताना या वेळेत शक्यतो कामे टाळावीत.
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
वीज कोसळताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर पडावे. मोबाईल, दूरध्वनीचा वापर टाळावा. पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन, विद्युत उपकरणे यांना स्पर्श न करता दूर राहावे. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यक असेल, तर खोलगट ठिकाणी थांबावे. धातूपासून बनविलेल्या वस्तू व विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. झाडाच्या उंचीपासून झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे.
- साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी