जळकोटातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:12+5:302020-12-15T04:36:12+5:30

जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गावपातळीवर राजकारण रंगले आहे. गावातील राजकीय मंडळी आतापासूनच इच्छुकांची ...

The trumpet of 27 Gram Panchayat elections in Jalkot sounded | जळकोटातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

जळकोटातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गावपातळीवर राजकारण रंगले आहे. गावातील राजकीय मंडळी आतापासूनच इच्छुकांची चाचपणी करीत असल्याने हिवाळ्यात राजकीय वातावरण मात्र तापले आहे.

जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी १० ते १२ ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. त्यात रावणकोळा, सोनवळा, माळहिप्परगा, बोरगाव, तिरुका, मरसांगवी, लाळी बु., लाळी खु., बेळसांगवी या गावांचा समावेश आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक मंडळींचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे आता उपसरपंच होऊन गावच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी विकासकामांवर भर दिल्याने बहुतांश गावांतील राजकीय मंडळींचे विकास निधीकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये राज्यमंत्री बनसोडे यांनी विविध विकासात्मक कामे केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्मथप्पा किडे हे सावध पद्धतीने आपले कार्य करीत आहेत. भाजपाचे माजी आमदार तथा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, तालुकाध्यक्ष रवींद्र नागरगोजे, माजी आ. गोविंद केंद्रे, नागनाथ निडवदे यांनीही राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

१३ ग्रामपंचायतींवर महिलाराज...

जळकोट तालुक्यातील २७ पैकी १३ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने आता स्थानिक पातळीवरही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकास आघाडीचे खलबते सुरु झाली आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यास तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. महाविकास आघाडीची बैठक ३० डिसेंबर रोजी होणार असून त्यात यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले यांनी सांगितले.

Web Title: The trumpet of 27 Gram Panchayat elections in Jalkot sounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.