थांबलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठमागून धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, सोळा जखमी
By संदीप शिंदे | Updated: October 26, 2023 13:22 IST2023-10-26T13:21:42+5:302023-10-26T13:22:32+5:30
जखमींवर पुण्यातील यवत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थांबलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठमागून धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, सोळा जखमी
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहजानी ते पुणे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सने थांबलेल्या ट्रकला पाटस घाटाजवळ पाठीमागून धडक दिल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील दोघे ठार तर सोळा जण जखमी झाले आहेत.
औराद शहाजानी येथील खासगी लोटस ट्रॅव्हल्स क्रमांक (एमएच ०९ सिव्ही ४५९७) बुधवारी रात्री पुण्यासाठी रवाना झाली होती. दरम्यान, पाटस घाटाजवळ टायर फुटल्याने उभा असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना गुरुवारी पहाटे ४.३० वाजता घडली. यामध्ये ट्रॅव्हल्समधील श्वेता प्रभू पंचाक्षरे व सत्यभामा शेषराव बोयणे (रा. औराद शहाजानी) यांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी गंभीर असून, इतर तेरा जण जखमी आहेत. जखमींवर पुण्यातील यवत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.