औश्यातील ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST2021-01-19T04:22:00+5:302021-01-19T04:22:00+5:30
तालुक्यातील उजनी ग्रामपंचायतीत १५ पैकी ८ जागा जिंकत राष्ट्रवादीचे योगीराज पाटील यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. लामजन्यात बालाजी पाटील ...

औश्यातील ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन
तालुक्यातील उजनी ग्रामपंचायतीत १५ पैकी ८ जागा जिंकत राष्ट्रवादीचे योगीराज पाटील यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. लामजन्यात बालाजी पाटील यांच्या पॅनेलने १७ पैकी १४ जागा जिंकल्या. नागरसोगा येथे सेवानिवृत्त शिक्षक भास्कर सूर्यवंशी यांनी ११ पैकी ८ जागांवर ताबा मिळविला. तळणी येथे सत्यवान जाधव पाटील व मोहन सावळसुरे यांच्या पॅनेलने ११ पैकी १० जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार समर्थकांना पराभव पत्करावा लागला आहे.
भादा ग्रामपंचायतीतील १३ पैकी १२ जागा जिंकून बालाजी शिंदे यांनी आपले वर्चस्व पुन्हा कायम ठेवले आहे. सेलू येथे माजी समाजकल्याण सभापती बालाजी कांबळे समर्थकांनी निर्विवाद वर्चस्व स्थापन करून ११ पैकी १० जागा मिळविल्या. हासेगाव येथे बालाजी बावगे यांच्या पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. खरोसा ग्रामपंचायतीमध्ये १३ पैकी ११ जागा जिंकून अजय साळुंखे यांच्या पॅनेलने विजय संपादन केला आहे. भेटा येथे ११ जागेपैकी बालाजी हजारे यांच्या पॅनेलला ५ जागांवर यश आले असून, विरोधी दोन्ही पॅनेलला प्रत्येकी ३ जागा मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
तपसे चिंचोली येथे ११ पैकी राजेश्वर पाटील यांनी ६ जागांवर विजय संपादन केला असून, सचिन कवठाळे यांना ५ जागा मिळाल्या आहेत. बेलकुंड ग्रामपंचायतीमध्ये विष्णू कोळी यांनी बहुमत प्राप्त केले. लखनगाव येथे ज्ञानोबा गोडभरले समर्थकांनी ६ जागा मिळविल्या आहेत. हरेगाव ग्रामपंचायतीमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व ११ जागा जिंकून विजयश्री खेचून आणली. तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये नवीन चेहऱ्यांना मतदारांनी पसंती दिली असून, प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले आहे.
औसा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहांमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये मतमोजणी झाली. मतमोजणीच्या ९ फेऱ्यांची व्यवस्था तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी शोभा पुजारी व नायब तहसीलदार शिवाजी कदम यांनी केली होती. शहरात वाहतुकीमुळे गर्दी होऊ नये म्हणून शासकीय विश्रामगृहापासूनच बॅरिकेट लावून रहदारी बंद केली होती. पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.