अहमदपुरातील महामार्गालगत आठवडी बाजार भरल्याने वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST2021-05-25T04:22:00+5:302021-05-25T04:22:00+5:30

अहमदपूर येथे सोमवारी आठवडी बाजार असतो. मागील दोन दिवस वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक ...

Traffic jam due to weekly market near highway in Ahmedpur | अहमदपुरातील महामार्गालगत आठवडी बाजार भरल्याने वाहतुकीची कोंडी

अहमदपुरातील महामार्गालगत आठवडी बाजार भरल्याने वाहतुकीची कोंडी

अहमदपूर येथे सोमवारी आठवडी बाजार असतो. मागील दोन दिवस वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक बाजारनिमित्ताने मुख्य रस्त्यावर आले होते. सकाळपासूनच किराणा, भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच परिसरातील छोटे शेतकरी आपला भाजीपाला घेऊन आले. मात्र, त्यांना जिल्हा परिषद मैदान दिले असतानाही तिथे न थांबता लातूर-नांदेड महामार्गावरील मुख्य चौकात दुकाने मांडून बसले होते. त्यामुळे गर्दी झाली. मुख्य चौकात फळगाडे, भाजीपाला विक्रेते आणि रहदारीमुळे वाहतुकीची कोंडी झाली. परिणामी, काही वेळ महामार्गावर वाहतूक बंद झाली.

ही बाब लक्षात येताच प्रशासनाने तत्काळ वाहतुकीची कोंडी दूर करून ग्रामीण भागातून आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांना जिल्हा परिषद मैदानावर जाण्याची सूचना केली. तेव्हा शेतकरी जाण्यास तयार नव्हते. प्रशासनास महामार्गावरील बाजार हटवावा लागला. त्यामुळे व्यापारी नाराज झाले. शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांचा फौजफाटा मुख्य बाजारपेठेत दाखल झाला. परिणामी, सर्वांची एकच धांदल उडाली. काही दुकानदारांनी दुकाने बंद केली, तर नागरिकांची धावपळ उडाली. त्यातच काही दुकानांत विनामास्क ग्राहक असल्याने पालिकेच्या पथकाने २१ आस्थापनांवर कारवाई केली.

व्यापाऱ्यांनी फिजिकल डिस्टन्स ठेवावा....

बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आपल्या वाहनाने येथे आले होते. त्यामुळे गर्दी झाली होती. व्यापाऱ्यांनी नागरिकांना फिजिकल डिस्टन्सविषयी आवाहन करावे. सकाळी ११ वा. नंतर काही आस्थापना चालू असल्याचे दिसून आल्याने पालिकेने २१ आस्थापनांवर कारवाई करून २७ हजारांचा दंड वसूल केला. नागरिक व व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ म्हणाले.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे...

लॉकडाऊन ३१ मे पर्यंत आहे. त्यात कुठल्याही प्रकारची सवलत देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे. गर्दी करू नये. भाजीपाल्यासाठी जिल्हा परिषद मैदानावर आपली दुकाने फिजिकल डिस्टन्स ठेवून लावावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

मद्यविक्री दुकानांसमोर गर्दी...

शहरातील मुख्य रस्त्यावर व गणेश मंदिराच्या बाजूला अशी दोन मद्यविक्रीची दुकाने आहेत. त्याठिकाणी होम डिलिव्हरीच्या नावाखाली जागेवरच विक्री केली जाते. त्यामुळे कायम गर्दी असते. मद्यविक्रीमुळे बाजारपेठेत अधिक नागरिक असल्याचे बहुतांश व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. प्रशासनाने अगोदर मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत होती.

Web Title: Traffic jam due to weekly market near highway in Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.