केंद्र सरकारच्या निर्बंधाला व्यापारी वैतागले, बंदमुळे आर्थिक घडी विस्कटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:13+5:302021-07-09T04:14:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर : गतवर्षीच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद राहिल्याने मोठ्यांबराेबरच छोटे व्यापारी, उद्योग, व्यवसायांना फटका बसला. ...

Traders annoyed by central government's restrictions, economic crisis shakes due to closure! | केंद्र सरकारच्या निर्बंधाला व्यापारी वैतागले, बंदमुळे आर्थिक घडी विस्कटली !

केंद्र सरकारच्या निर्बंधाला व्यापारी वैतागले, बंदमुळे आर्थिक घडी विस्कटली !

लोकमत न्यूज नेटवर्क

उदगीर : गतवर्षीच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद राहिल्याने मोठ्यांबराेबरच छोटे व्यापारी, उद्योग, व्यवसायांना फटका बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा उद्योग, व्यवसाय बंद राहिले. दरम्यान, केंद्र सरकारने धान्य साठवणुकीसाठी व्यापाऱ्यांवर मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे आडत बाजार बंद आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील इतर बाजारपेठांवर झाला असून, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.

उदगीर तालुका हा तीन राज्यांच्या सीमेवर असून, व्यापारीदृष्ट्या लातूरनंतर विकसित बाजारपेठ म्हणून त्याकडे पाहिले जाते. उदगीरात जवळपास ४० दाल मिल, १५ फुटाणा मिल व सोयाबीनवर प्रक्रिया करणारे दोन मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतीपूरक असल्यामुळे येथील बाजारपेठेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर कारखाने अवलंबून आहेत. येथील मोंढ्यात दररोज कोट्यवधींची उलाढाल असते. तसेच कापड, किराणा, बी-बियाणे, खते, सराफा बाजारातही मोठी उलाढाल असते.

कोरोनामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांवर निर्बंध लागू केले. त्याचा फटका छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांना बसला आहे. दुकानभाडे, कामगारांचे पगार, बँकेचे कर्ज, वीजबिल हे व्यवसाय सुरु असला अथवा नसला तरी भरावेच लागते. निर्बंधांमुळे व्यापारी अडचणीत आहेत. साधारणत: ग्रामीण भागातील ग्राहक सकाळी शेतीची कामे उरकून दुपारी येतो. मात्र, दुपारी ४ वाजता बाजारपेठ बंद होत असल्याने या ग्राहकाला काही ठराविक वस्तू घेता येत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी येणे कमी केले आहे. केवळ किराणा मार्केटमध्ये थोडेफार व्यवहार होतात.

दि. १ जुलैपासून केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना शेतीमालाच्या धान्य साठवण्यावर मर्यादा आणली आहे. त्यामुळे मोंढ्यातील व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी बंद सुरु केल्याने मोंढ्यात उलाढाल नाही. त्यामुळे येथील व्यापारी आणि बाहेरील इतर बाजारपेठेतील व्यापारी शासनाच्या वेळेच्या बंधनामुळे वैतागले आहेत. ग्राहक नसल्याने आर्थिक गणित विस्कटले आहे.

केंद्राने नवीन आदेश मागे घ्यावा...

केंद्र सरकारने नवा आदेश काढून व्यापाऱ्यांना अडचणीत आणले आहे. शेतमालाचे सर्व दर शासनाने जाहीर केलेल्या हमीदराच्या जवळपास असतानाही नवा कायदा लागू करून शासन अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. सध्या हंगाम नाही. परंतु, जेव्हा हंगाम सुरू होईल तेव्हा त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल. नवीन आदेश मागे घेण्यात यावा म्हणून आम्ही बंदमध्ये सहभागी आहोत.

- सुदर्शन मुंढे, अध्यक्ष, उदगीर दाल मिल असोसिएशन.

शासनाच्या नियमाचा फटका कपडा बाजाराला बसला आहे. आमचा व्यवहार २० टक्क्यांवर आला आहे. अशा परिस्थितीत कामगारांचा पगार, वीजबिल, बँकेचे कर्ज व घर खर्च निघणे अवघड झाले आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकाने कायमची बंद केली आहेत. कोरोनाच्या नावाखाली वेळेचे बंधन लागू करुन सरकार नेमके काय साध्य करणार आहे, हेच आम्हाला कळत नाही. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता सरकारने व्यापाऱ्यांवर लागू केलेले निर्बंध मागे घ्यावेत.

- गणेश मुक्कावार, कापड व्यापारी.

Web Title: Traders annoyed by central government's restrictions, economic crisis shakes due to closure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.