निर्बंधामुळे व्यापाऱ्यात नाराजी, प्रशासनाची दुकाने बंदची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:21+5:302021-06-28T04:15:21+5:30
अहमदपूर : डेल्टा प्लसच्या धास्तीने प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केल्याने पूर्वपदावर आलेल्या व्यापारापुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांतून ...

निर्बंधामुळे व्यापाऱ्यात नाराजी, प्रशासनाची दुकाने बंदची सक्ती
अहमदपूर : डेल्टा प्लसच्या धास्तीने प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केल्याने पूर्वपदावर आलेल्या व्यापारापुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांतून नाराजीचा व्यक्त होत आहे. रविवारी प्रशासनाने आस्थापना सक्तीने बंद केल्या आहेत.
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने रविवारी शहरातील सकाळच्या सत्रात उघडलेली दुकाने पालिका, पोलीस व महसूलच्या हस्तक्षेपानंतर बंद करण्यात आली. बऱ्याच दिवसांनी पूर्वपदावर आलेला व्यवहार पुन्हा खोळंबणार असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेने किमान एक दिवस अगोदर माहिती देणे गरजेचे असल्याचा सूर व्यापाऱ्यात दिसून आला. त्यानंतर प्रशासनाने औषधी, कृषी व अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद केली. दरम्यान, ग्राहकांचीही तारांबळ उडाली.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या कडक निर्बंधाची प्रशासनाने २४ तास अगोदर जागृती व प्रबोधन करणे आहे. परंतु, प्रशासनाने आदेश काढून तत्काळ अंमलबजावणी सुरू केल्यामुळे व्यापाऱ्यांत गोंधळ निर्माण झाला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन...
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधाची अंमलबजावणी २६ जूनपासून करण्याचे आदेश दिल्यामुळे सकाळी पालिकेच्या वतीने सर्व आस्थापनांना सूचित करण्यात आले. त्यांना कुठलाही दंड आकारण्यात आला नाही. सोमवारपासून मात्र सर्वांनी नियम पाळावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले.
दुकानाची वेळ ४ वा. पर्यंत...
सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व आस्थापना सकाळी ९ ते दुपारी ४ वा. पर्यंत सुरू करावेत. त्यामुळे नागरिकांची सोय होणार असल्याचे व्यापारी संगमेश्वर नीला, लियाकत लष्करी, श्याम भुतडा, सचिन करकनाळे, जयप्रकाश भुतडा, अश्विन आंधळे, तानाजी पाटील, सतीश लोहारे, विलास शेटे यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी स्वतः रस्त्यावर...
सकाळच्या सत्रात संपूर्ण बाजारपेठ चालू असल्याचे समजताच उपविभागीय अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना विक्री बंद करण्याचे आवाहन केले. त्यांच्यासोबत पालिका, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.