निलंग्यात ट्रॅक्टर- दुचाकीची समोरसमोर धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: March 12, 2024 16:19 IST2024-03-12T16:19:31+5:302024-03-12T16:19:44+5:30
निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन येथील घटना

निलंग्यात ट्रॅक्टर- दुचाकीची समोरसमोर धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू
निलंगा (जि.लातूर) : ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना निलंगा ते राठोडा या मार्गावरील अंबुलगा मेन येथे मंगळवारी घडली. या अपघातात दुचाकीवरील दाेघांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन गावाजवळ मंगळवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर कारखान्याकडे निघाला होता. दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवरील गोविंद पांडुरंग कांबळे (वय ३५ रा. राठोडा), दिनकर रावसाहेब तोंडवळे (वय ४५ रा. अंबुलगा मेन) या दोघांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. तर गोविंद मारुती गायकवाड (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. यावेळी पोलीस निरीक्षक बालकृष्ण शेजाळ, सुनील पाटील, विनोद गोमारे, खंडू कांबळे यांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर आक्रोश करीत ट्रॅक्टरवर दगडफेक केली.