जनादेश नसलेले तीन पक्षांचे सरकार घाबरट - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:42 IST2020-11-11T17:40:57+5:302020-11-11T17:42:35+5:30
अतिवृष्टीसाठी सरकारने १० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा फसवी असून ही रक्कम तुटपुंजी आहे.

जनादेश नसलेले तीन पक्षांचे सरकार घाबरट - चंद्रकांत पाटील
लातूर : जनादेश नसताना महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारने राज्याची वाट लावली असून, केवळ घोषणा केल्या जातात; परंतु अंमलबजावणी होत नाही, सरकार घाबरट आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले, राज्य सरकारमध्ये सावळागोंधळ आहे. त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही. सारथी संस्थेसाठी आर्थिक तरतूद नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळही बरखास्त केले आहे. या सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. आता नागपूर अधिवेशन मुंबईत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातच झाले पाहिजे, तसेच अतिवृष्टीसाठी सरकारने १० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा फसवी असून ही रक्कम तुटपुंजी आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांंनी एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. या मागणीचा आता त्यांना का विसर पडला? असेही ते म्हणाले.
पत्रपरिषदेला माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची उपस्थिती होती.