खेळाच्या मैदानावर काटेरी झुडुपे, दारे- खिडक्यांची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST2021-08-15T04:21:58+5:302021-08-15T04:21:58+5:30
अहमदपूर : शहरातील सर्वात जुन्या असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेची दुरावस्था झाली आहे. दारे- खिडक्यांची मोडतोड झाली असून खेळाच्या मैदानात ...

खेळाच्या मैदानावर काटेरी झुडुपे, दारे- खिडक्यांची मोडतोड
अहमदपूर : शहरातील सर्वात जुन्या असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेची दुरावस्था झाली आहे. दारे- खिडक्यांची मोडतोड झाली असून खेळाच्या मैदानात काटेरी झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे काही जण या परिसराचा शौचासाठी वापर करीत आहेत. तसेच वर्गखोल्याही धोकादायक झाल्या आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
अहमदपूर येथे १९२१ साली जिल्हा परिषद प्रशालेची इमारत उभारण्यात आली. येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. जुनी आणि नावलौकिक झाल्याने प्रशालेत विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सध्या या प्रशालेला विविध समस्यांनी घेरले आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान असले तरी त्यावर काटेरी झाडे उगवली आहेत. प्रशालेला संरक्षक भिंत नसल्याने परिसरातील नागरिक मैदानाचा उपयोग हा शौचासाठी करीत आहेत. परिणामी, दुर्गंधी पसरत आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम योजनेअंतर्गत शासनाने घसरगुंडी बांधून दिली आहे. परंतु, तिची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे खर्च निष्फळ ठरत आहे. तसेच काही विघ्नसंतोषींनी प्रशालेचे दरवाजे, खिडक्यांची तोडफोड केली आहे. मैदानावर मोकाट जनावरांचा वावर आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशालेला होताहेत शंभर वर्षे पूर्ण...
जिल्हा परिषद प्रशालेची स्थापना १९२१ मध्ये झाली असून शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या प्रशालेतील वर्ग खोल्यांचीही दुरावस्था झाली आहे. काही वर्गांना पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दरम्यान, पटसंख्या कायम रहावी म्हणून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर...
अहमदपुरातील ही सर्वात जुनी प्रशाला आहे. प्रशालेच्या मैदानावर उगवलेली काटेरी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत आहेत. अजूनही काही झाडे उगवली असून, ती लवकरच काढण्यात येतील. त्या जागेवर मियावाकी पध्दतीने वृक्षरोपण करण्यात येणार आहे. वर्गखोल्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. मंजुरीनंतर दुरुस्ती होईल.
- बबनराव ढोकाडे, गटशिक्षणाधिकारी.
मुलभूत सुविधांचा अभाव...
प्रशालेच्या इमारतीची जीर्ण अवस्था झाली आहे. त्यामुळे नवीन बांधकाम करावे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सात एकरवर ही प्रशाला आहे. सध्या प्रशालेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालय नाही. शाळेचा परिसर स्वच्छ नाही. जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रशालेच्या परिसरात गट साधन केंद्र व इतर कार्यालय आहेत. तिथेही अशीच स्थिती आहे.
- अशोक सोनकांबळे, पालक.