गुप्ती येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:23+5:302021-08-18T04:26:23+5:30
पानगाव येथून दुचाकीची चोरी लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे एम.एच. २४ ए.एस.६९६२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना ...

गुप्ती येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी
पानगाव येथून दुचाकीची चोरी
लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे एम.एच. २४ ए.एस.६९६२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत विठ्ठल उद्धव सिरसाट (रा. रामवाडी ता.रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हांगरगे करीत आहेत.
विद्युत मोटारीसह शेती साहित्य चोरीला
लातूर : उदगीर तालुक्यातील डोंगरज शिवारातील विद्युत मोटारीसह शेती उपयोगी साहित्य चोरीला गेल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डोंगरात शिवारात राम दत्तात्रय नरवाडे यांचे शेत आहे. त्यांनी शेतातील बंधाऱ्यावर विद्युत मोटर आणि शेती उपयोगी साहित्य ठेवले होते. त्याची चोरी झाल्याची घटना घडली. एकूण १८ हजाराचे साहित्य चोरीला गेले असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद असून पुढील तपास पोना. रंगवाड करीत आहेत.
सामायिक बांधावरून कुऱ्हाडीने मारहाण
लातूर सामायिक बांधावरून चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना घडली. फिर्यादीच्या कपाळावर मारून जखमी केले. तू जर यापुढे सामायिक बांधावर आलास तर तुला जिवंत ठेवणार नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, असे विजयकुमार अंकुशराव मुंजाळे यांनी चाकूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मधुकर माधव तोंडारे (रा. नळेगाव ता. चाकूर) यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सिरसाट करीत आहेत.
माळहिप्परगा येथे घर फोडून चोरी; दोन लाखाचा ऐवज पळविला
लातूर : जळकोट तालुक्यातील माळहिपरगा येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण १ लाख ९० हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याबाबत जळकोट पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जळकोट तालुक्यातील माळहिपरगा येथे फिर्यादी नामदेव रामचंद्र केंद्रे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच संदुकात ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख नव्वद हजार शंभर रुपयांचा ऐवज चोरला. याबाबत नामदेव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून जळकोट पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोईनवाड करीत आहेत.
खंबळवाडी येथे घरफोडी; दोन लाखांचा ऐवज लंपास
लातूर : जळकोट तालुक्यातील खंबळवाडी येथे घरी कोणी नसल्याचे पाहून घरफोडी झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. या घरफोडीत चोरट्यांनी डाळीच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख ५४ हजार असे एकूण एक लाख नव्वद हजार शंभर रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध जळकोट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रमेश शेटीबा देवकते यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात डाळीच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम ५४ हजार असा एकूण एक लाख ९० हजार १०० रुपयांचा ऐवज चोरला. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळकोट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. चिमणदरे करीत आहेत.