काळ आला होता पण...ट्रक-कारच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी, सुदैवाने ६ जण बचावले

By हरी मोकाशे | Published: December 29, 2023 05:59 PM2023-12-29T17:59:24+5:302023-12-29T18:00:13+5:30

ट्रकने पत्र्याच्या शेडला पूर्णपणे बेचिराख केले

The time had come but... In a terrible truck-car accident, two were seriously injured, luckily 6 survived | काळ आला होता पण...ट्रक-कारच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी, सुदैवाने ६ जण बचावले

काळ आला होता पण...ट्रक-कारच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी, सुदैवाने ६ जण बचावले

निलंगा : लातूर - जहिराबाद महामार्गावरील गौरपाटीजवळ ट्रक व कारची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. अपघातातील जखमींत आ. संभाजी पाटील- निलंगेकर यांचे स्वीय सहायक व भाजपा शहराध्यक्षांचा समावेश आहे.

लातूर - जहिराबाद महामार्गावरील गौरपाटी (ता. निलंगा) येथे लातूरकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच २४, जे ६४४६) व लातूरहून निघालेली कार क्रमांक (एमएच २४, एडब्ल्यू ६७२५) या दोन वाहनांची गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांचे स्वीय सहायक अरविंद चव्हाण व निलंगा भाजपाचे शहराध्यक्ष तम्मा माडीबोणे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी लातूरला हलविले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या गोविंद शिंदे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. यावेळी सुदैवाने सहा जण बचावले.

काळ आला होता पण...
गौर येथील रोहित शिंदे व व्यंकट शिंदे हे दोघे भाऊ आपल्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये प्रदीप तावडे, शुभम चव्हाण, एकनाथ देशपांडे, जयहरी बोरुळे या मित्रांना घेऊन जेवणासाठी बसले होते. तेवढ्यात मोठा आवाज झाला. रस्त्यावरील गाडीचे टायर फुटले असावे, असा अंदाज बांधला. मात्र, क्षणार्धात ट्रक या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. तेव्हा आम्ही कसे बाहेर पडलो, हे आम्हालाही काही क्षण कळाले नाही. आम्ही असलेले सहाजण सुखरूप आहोत हे आम्हालाच काही वेळ कळत नव्हते. कारण ट्रकने पत्र्याच्या शेडला पूर्णपणे बेचिराख केले होते. आम्ही कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी लातूरला पाठविले. आम्हावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

दोन लाखाच्या लॅपटॉपचा चुराडा...
जेवणापूर्वी मी लॅपटॉपवरून कंपनीचे ऑनलाइन काम करत होतो. परंतु, आम्ही बसलेल्या ठिकाणी ट्रक घुसल्याने लॅपटॉपचा चुराडा झाला. त्यात दोन लाखाचे नुकसान झाले, असे प्रदीप तावडे यांनी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर कार ५० ६० फुट दूर गेली होती.

Web Title: The time had come but... In a terrible truck-car accident, two were seriously injured, luckily 6 survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.