लातूर महापालिकेची गत निवडणूक ५४ कोट्यधीश उमेदवारांनी गाजवली; सर्वाधिक भाजपचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:51 IST2025-12-19T18:50:09+5:302025-12-19T18:51:16+5:30
मनपा निवडणूक २०१७ : ७० जागांसाठी १६६ अपक्षांसह ३९६ उमेदवार होते रिंगणात

लातूर महापालिकेची गत निवडणूक ५४ कोट्यधीश उमेदवारांनी गाजवली; सर्वाधिक भाजपचे
- रामकिशन भंडारे
लातूर : लातूर महापालिकेत २०१७ मध्ये रिंगणात उतरलेल्या ३९६ उमेदवारांपैकी ५४ उमेदवार करोडपती असल्याचे उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून समोर आले आहे. सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती ६८ लाख एवढी असली तरी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती एक कोटीहून अधिक आहे.
सर्वाधिक संपत्तीची नोंद असलेले उमेदवार...
- निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वात श्रीमंत उमेदवार राजासाब मनियार (राष्ट्रवादी), मकरंद सावे (राष्ट्रवादी), ओमप्रकाश पडिले (काँग्रेस), विक्रांत गोजमगुंडे (काँग्रेस), दीपाताई गीते (भाजप), रमेशसिंग बिसेन (काँग्रेस), चंद्रकांत बिराजदार (भाजप), नेताजी देशमुख (अपक्ष), पंडित कावळे (काँग्रेस), मनोजकुमार राजे (काँग्रेस) यांचा समावेश होता.
- समीना शेख (भाजप), अस्लम सय्यद (शिवसेना) यांची संपत्ती शून्य आहे. तसेच प्रेमकुमार दिवे (शिवसेना) आणि सपना किसवे (काँग्रेस) यांनी पॅनकार्ड सादर केले नसल्याने त्यांच्या संपत्तीची नोंद शून्य असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- २०१७च्या मनपा निवडणुकीतील ३९६ उमेदवारांच्या आर्थिक पार्श्वभूमीचे विश्लेषणानुसार १४ टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाही निवडणुकीच्या रिंगणात केवळ राजकीय चुरस नाही, तर ‘धनशक्ती’चाही प्रभाव असणार आहे.
करोडपती उमेदवार (२०१७)
पक्षाचे नाव - उमेदवारांची संख्या - करोडपती उमेदवार - टक्केवारी
भाजप - ६६ - २३ - ३५ टक्के
काँग्रेस - ६९ - १९ - २८ टक्के
राष्ट्रवादी - ५१ - ५ - १० टक्के
शिवसेना - ४४ - ३ - ७ टक्के
अपक्ष/इतर - १६६ - ४ - २ टक्के
एकूण - ३९६ - ५४ - १४ टक्के
सरासरी मालमत्ता ६८ लाखांच्या घरात...
२०१७च्या निवडणुकीत उभ्या असलेल्या ३९६ उमेदवारांची सरासरी मालमत्ता ६८ लाख ७० हजार ६११ रुपये इतकी आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती १ कोटी ४३ लाख रुपये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची १ कोटी २० लाख तर भाजपच्या उमेदवारांची संपत्ती १ कोटी ४ लाख रुपये इतकी आहे.