रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By हरी मोकाशे | Updated: September 7, 2022 15:53 IST2022-09-07T15:52:50+5:302022-09-07T15:53:57+5:30
सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे.

रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा
रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात ९८.११ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात पाण्याचा येवा सुरू असल्याने बुधवारी सकाळी प्रकल्पाचे क्रमांक ३ व ४ चे दोन दरवाजे १० सेमीने उघडून रेणा नदी पात्रात ६२६.७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
रेणा मध्यम प्रकल्प हा दरवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरतो. मात्र १०- १२ वर्षांनंतर प्रथमच रेणा मध्यम प्रकल्प हा पावसाळा सुरू झाल्यानंतर तीन ते चारदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. यंदा या प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही पाचवी वेळ आहे. पहिल्यांदा १४ जुलै रोजी, दुसऱ्यांदा २८ जुलै रोजी, तिसऱ्यांदा ९ ऑगस्ट रोजी, आता मंगळवारी व बुधवारी दोन दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहेत.
सध्या प्रकल्पातील पाणीपातळी ६०८.४५ मी. एवढी आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रकल्पाचे सहापैकी दोन दरवाजे मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वा व पुन्हा बुधवारी सकाळी ७ वा. १० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यातून रेणा नदीपात्रात १७.७५ क्युमेक्स म्हणजेच ६२६.७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या प्रकल्पात २१.२९८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे. त्याची ९८.११ टक्केवारी आहे. प्रकल्पाच्या दोन्ही दरवाज्यांतून ६२६.७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग रेणा नदीपात्रात होत आहे. नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहता, केव्हाही पाणी बंद केले जाऊ शकते. तसेच केव्हाही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.