कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’
By राजकुमार जोंधळे | Updated: January 19, 2025 22:42 IST2025-01-19T22:40:49+5:302025-01-19T22:42:26+5:30
प्रतिबंधात्मक उपाययोजना : उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील

कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’
उदगीर/लातूर : उदगिरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाल्याने उदगीर पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. रविवारी दोन्ही ठिकाणे निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आली. या क्षेत्रात नागरिकांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच सर्वेक्षण करण्यात येत असून, कुक्कुटपक्ष्यांचे नमुनेही घेतले जात आहेत.
शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी परिसरात कावळे दगावल्याची घटना घडली. भोपाळच्या प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात बर्ड फ्लूमुळे कावळे मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तिन्ही ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. तसेच या परिसराच्या १० किमीच्या परिघातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.
निर्जंतुकीकरण मोहीम...
कावळे दगावलेल्या तिन्ही ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच तेथील व्यावसायिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. - सुशांत शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा पालिका प्रशासक
सर्वेक्षण करणे सुरू...
रविवारी आणखीन दोन आजारी कावळे दगावले असून, मयत कावळ्यांची संख्या ५३ झाली आहे. या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच १० किमी परिघातील कुक्कुटपक्ष्यांचे नमुने घेतले जात आहेत. -डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन