अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:45+5:302021-08-20T04:24:45+5:30
लातूर : अफगाणिस्तानातील तणावग्रस्त वातावरणामुळे अफगाणी ड्रायफ्रुट्स जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी महागली आहेत. पिस्ता, जर्दाळू, खिसमिस, अंजीर आदी ...

अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले
लातूर : अफगाणिस्तानातील तणावग्रस्त वातावरणामुळे अफगाणी ड्रायफ्रुट्स जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी महागली आहेत. पिस्ता, जर्दाळू, खिसमिस, अंजीर आदी ड्रायफ्रुट्सचे दर वधारले आहेत. पिस्ता २०० रुपये, अंजीर १०० रुपये तर जर्दाळू वीस रुपयांनी महागले आहे. पाच दिवसांपासून दर वाढल्याने ड्रायफ्रुट्सच्या ग्राहकांनी हात आखडते घेतले आहेत.
कोरोनानंतर जिल्ह्यात ड्रायफ्रुट्सच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ड्रायफ्रुट्सची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढल्याने अफगाणी ड्रायफ्रुट्सचे दर चांगलेच वधारले आहेत. पाच दिवसांपूर्वी बाराशे रुपये किलो असणारा पिस्ता आता चौदाशे रुपये किलो झाला आहे. अक्रोडचा दर ६०० रुपये किलो होता. आता त्यात दोनशे रुपये वाढ होऊन हा दर आठशे रुपये किलो झाला आहे. सर्वच ड्रायफ्रुट्सचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी हात आखडता घेतला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दोन आठवडे पुरेल इतका साठा शिल्लक...
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर अचानक जिल्ह्यात ड्रायफ्रुट्सचे ग्राहक वाढले. प्रतिकारशक्ती या फ्रुट्समुळे वाढत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ड्रायफ्रुट्सला मागणी वाढली होती. मात्र अचानक दर वाढल्यामुळे ग्राहक आता खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. तरीही व्यापाऱ्यांनी याचा साठा केला आहे. पूर्वीच्या दराने ड्रायफ्रुट्सची विक्री केली जात नसली तरी अनेक व्यापाऱ्यांकडे ड्रायफ्रुट्सचा साठा आहे.
मागणी, पुरवठानुसार दर कमी-जास्त...
ड्रायफ्रुट्स व्यापारी म्हणाले, कोणत्याही मालाचे दर मागणी-पुरवठानुसार कमी-जास्त होतात. कधी मागणी वाढल्याने दर वाढतात तर कधी कमी होतात. कोरोनामुळे ड्रायफ्रुट्सला मागणी वाढली आहे. अफगाणिस्तानमधील तणावाचा इथे प्रश्न नाही. दरवर्षी दर कमी-अधिक होत असतात. उत्पन्न घटले तर भाव वाढतात, अशी अनेक कारणे भाववाढीमागे आहेत. अफगाणिस्तानातील तणाव या दरवाढीला कारणीभूत नाही, असे व्यापारी अनिल रेखावार यांच्यासह अन्य विक्रेत्यांनी सांगितले.