दहा किलो चंदन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:47+5:302021-08-23T04:22:47+5:30
नाला बुजविण्याच्या कारणावरून मारहाण लातूर: नाला बुजविण्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाल्याची घटना मसला ते गादवड रोड परिसरातील शेत गट ...

दहा किलो चंदन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नाला बुजविण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर: नाला बुजविण्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाल्याची घटना मसला ते गादवड रोड परिसरातील शेत गट नंबर दोनच्या उत्तरेस घडली. याबाबत विनायक बळीराम धुमाळ (रा. मसला, ता. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणिक बळीराम धुमाळ यांच्याविरुद्ध मुरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी तसेच बुटाने मारून खाली पाडले तसेच डाव्या हाताच्या पंजावर मारून जखमी केले, असेही तक्रारीत म्हटले आहे.
गाय, म्हैस चोरीला, काजळ हिप्परगा शिवारातील घटना
लातूर : काजळ हिप्परगा शिवारात शेतातील गोठ्यात बांधलेली गाय व म्हैस चोरीला गेल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत गोविंद प्रल्हाद मंदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाईची किंमत पंधरा हजार रुपये तर म्हैशीची किंमत पाच हजार रुपये होती. एकूण नव्वद हजारांची जनावरे चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तपासी अंमलदार गिरी करत आहेत.
दुकानासमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास
लातूर : दुकानासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना अहमदपूर येथे घडली. याबाबत सोमनाथ हरिनाथ देवनाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल केंद्रे करत आहेत.
शेतातून पशुधनाची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
लातूर : कासारशिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामलिंग मुदगड परिसरातील शिवारात आंब्याच्या झाडाला दोन गायी बांधून घराकडे गेल्यानंतर त्या गायींची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सुरेखा भीमाशंकर नाकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध कासारशिरसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल घोरपडे करत आहेत.
दोन तोळ्याची गंथन हिसकावून पोबारा
लातूर: लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात उदगीरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना फिर्यादी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची गंथन हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना घडली. या गंथनची किंमत ६० हजार रुपये असून, याबाबत सविता व्यंकट गंगापुरे (रा. मजगे नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जाधव करत आहेत.
औराद येथून दुचाकीची चोरी, गुन्हा दाखल
लातूर : औराद येथील एका फोटो दुकानासमोरील मोकळ्या जागेत पार्किंग केलेल्या (एमएच २४ क्यू ७४६६) क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली आहे. याबाबत प्रताप चांगदेवराव निपाणीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध औराद शहाजनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.