..अन् डोळ्यांतून वाहू लागले अश्रू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:31+5:302021-09-02T04:42:31+5:30

लातूर : राष्ट्रीय आराेग्य अभियानअंतर्गतच्या कंत्राटी आरोग्य सेविकांचे ३१ ऑगस्टनंतर सेवा समाप्तीचे आदेश अभियान संचालकांनी दिल्याने धास्तावलेल्या जिल्ह्यातील २२ ...

..Tears began to flow from the eyes! | ..अन् डोळ्यांतून वाहू लागले अश्रू !

..अन् डोळ्यांतून वाहू लागले अश्रू !

लातूर : राष्ट्रीय आराेग्य अभियानअंतर्गतच्या कंत्राटी आरोग्य सेविकांचे ३१ ऑगस्टनंतर सेवा समाप्तीचे आदेश अभियान संचालकांनी दिल्याने धास्तावलेल्या जिल्ह्यातील २२ आरोग्य सेविकांनी जिल्हा परिषदेच्या आराेग्य अधिका-यांकडे धाव घेऊन साहेब, यापूर्वी आम्ही कायम करा म्हणून आपल्याकडे येत होतो. मात्र, कायमऐवजी आम्हाला कंत्राटी पद्धतीने तरी कामावर राहू द्या. जर नोकरी गेली तर संसार कोलमडेल, अशी विनंती करीत डोळ्यांतून अश्रू ढाळत होत्या. शासन निर्णयानुसार अन्यत्र कुठेतरी समायोजन होईल, असा दिलासा देण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्य अधिकारी करीत होते.

केंद्र शासनाने सन २०२१- २२ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर न केलेली आरोग्य सेविकांची पदे रद्द करण्याचा आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अभियान संचालकांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांची पदे रद्द होऊन त्यांना १ सप्टेंबरपासून सेवेतून कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यासाठी एक वर्षात एकही बाळंतपण न केलेेले उपकेंद्र, तसेच सन २०११ च्या जनगणनेनुसार कमीत कमी लोकसंख्या असलेल्या उपकेंद्रांतील कंत्राटी आरोग्य सेविकांची पदे रद्द केली जाणार आहेत. जिल्ह्यात अशा कंत्राटी आरोग्य सेविकांची संख्या २२ आहे.

जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र व २५२ उपकेंद्र आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानास सन २००५ पासून सुरुवात झाली. तेंव्हापासून या आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यांना मासिक १८ हजार वेतन देण्यात येते. कंत्राटी आरोग्य सेविका मागील जवळपास १४ वर्षांपासून वाडी- तांड्यावर जाऊन आरोग्यविषयक जनजागृती करण्याबराेबर आरोग्य सेवा देत आहेत. गत दीड वर्षांपासून सुरू झालेल्या कोविडच्या काळात तर स्वत:च्या, कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता दिवस- रात्र सेवा दिली. मात्र, त्यांना अचानकपणे कार्यमुक्त केले जात असल्याने अस्वस्थता पसरली आहे.

१० वर्षाच्या मुलीला खोलीत कोंडून कर्तव्यावर...

माझी १० वर्षांची मुलगी आहे. दुसऱ्या लाटेत मुलीला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे मी केवळ तीन दिवस रजा घेतली आणि चौथ्या दिवशी कर्तव्यावर हजर झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव कुटुंबातील इतर मंडळींना होऊ नये म्हणून मुलीला एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यावेळी मुलीजवळ थांबणे गरजेचे होते. परंतु, कोविडच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हते, पण आज नोकरीचाही शेवटचा दिवस ठरणार आहे, असे कंत्राटी आरोग्य सेविका स्वाती कांबळे यांनी सांगितले.

सतत निष्ठेने कार्य केले...

मुख्यालयी राहून गेल्या १०- १० वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली आहे. कोविडच्या काळात तर घरोघरी जाऊन बाधितांचा स्वॅब घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कामे केली आहेत. शासनाने कायम करण्याऐवजी कार्यमुक्त करण्याचा घेतलेला निर्णय हा आमच्याबराेबरच कुटुंबासाठी धक्कादायक आहे, असे भाग्यश्री चौधरी यांनी सांगितले.

संधी दिली, पण न परवडणारी...

कंत्राटी आरोग्य सेविकांना यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत काम करण्याची इच्छा असल्यास आपले अर्ज आरोग्य उपसंचालकांकडे सादर करावे लागणार आहेत. त्यात रिक्त पदे पाहून सेवा ज्येष्ठतेनुसार संधी दिली जाणार आहे. ही संधी दिली असली तरी परवडणारी नाही. कारण एका तालुक्यातील आरोग्य सेविकास दुसऱ्या तालुक्यात अथवा जिल्ह्यात तेवढ्याच वेतनावर काम करावे लागणार आहे. त्यामुळे त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागणार कसा, असा सवाल व्यक्त केला.

Web Title: ..Tears began to flow from the eyes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.