काळ्या फिती लावून शिक्षकांनी नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:52+5:302021-07-29T04:20:52+5:30
१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू आहे. अशा शिक्षकांचे त्यांच्या पगारातून ...

काळ्या फिती लावून शिक्षकांनी नोंदविला निषेध
१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू आहे. अशा शिक्षकांचे त्यांच्या पगारातून मासिक १० टक्के वेतन कपात केले जाते. मात्र, १५ वर्षांपासून या शिक्षकांच्या कपात झालेल्या रकमेचा हिशेब देण्यात आला नाही. शासन आदेशानुसार त्यांना आर-३ नमुन्यात दरवर्षी हिशेब देणे अपेक्षित होते. तसेच ७ व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता जून २०१९ मध्ये द्यायला हवा होता. तो अजूनही डीसीपीएसधारक शिक्षकांना देण्यात आला नाही. या सर्व बाबी पूर्ण करूनच शिक्षकांचे एनपीएसचे सीएसआरएफ फॉर्म भरून घ्यायचे आहेत. मात्र, या सर्व बाबी प्रलंबित ठेवून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे फॉर्म भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी वेतन बंद करणे, वेतनवाढ थांबविणे असा दबाव टाकला जात आहे. त्याचा निषेध करीत दोन दिवस काळ्या फिती लावून काम केले जात आहे, असे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी सांगितले. या आंदोलनास तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच आश्रमशाळा शिक्षकांनीही आपल्या शाळेवर राहून काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला, असे आवाहन तालुकाध्यक्ष राहुल मोरे यांनी केले. आंदोलनात रमाकांत हाडोळे, शिवराज देवर्षे, संतोष म्हेत्रे, रावजादे, गोस्वामी, शेख यांनी सहभाग नोंदविला.