आंबट चिंचेची गोड कहाणी, बाजारात आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:22+5:302021-03-07T04:18:22+5:30
ग्रामीण भागातील शेतीच्या बांधावर आंबा, चिंच झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असते. चिंचेचे झाड वाढण्यासाठी त्याला पाणी कमी लागते ...

आंबट चिंचेची गोड कहाणी, बाजारात आवक वाढली
ग्रामीण भागातील शेतीच्या बांधावर आंबा, चिंच झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असते. चिंचेचे झाड वाढण्यासाठी त्याला पाणी कमी लागते तर झाडाची मुळे खोलवर जातात. उन्हाळ्यात हे झाड हिरवे असल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांना, जनावरांना थांबण्यासाठी झाडाच्या सावलीचा फायदा होतो. परिणामी, शेतात, गावाच्या भोवताली चिंचेची झाडे फार पूर्वीपासून आढळून येतात. चिंचेपासून अनेक खाद्यपदार्थ, औषधी पदार्थ तर चिंचेच्या आत असणाऱ्या चिंचोक्यापासून विविध पदार्थ बनविले जातात. स्वयंपाकघरात महिला अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी वापर करतात. शासनानेही या बहुआयामी झाडाची लागवड वाढावी म्हणून १९९५ पासून १०० टक्के अनुदान सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंचेची लागवड करण्यात रस दाखवत आहेत.
मागील वर्षी अवकाळी पावसामुळे चिंचेला फुलोरा कमी प्रमाणात आल्याने फळधारणा कमी झाली होती. त्यामुळे, उत्पादनात घट झाल्याने बाजारात चिंचेला १२ ते २० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला हाेता. मात्र, यंदा जून महिन्यापासून पावसाने सातत्य ठेवल्याने चिंचेच्या झाडाला मोहर चांगला लागला होता. यातून यंदा चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. ग्रामीण भागात २० वर्षांपूर्वी गावरान चिंचेची लागवड शेतीच्या बांधावर आणि सावलीसाठी केली जात होती. आता बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे चिंचेचे वेगवेगळे वाण उपलब्ध झाले आहेत. मागणीबरोबर उत्पादनही वाढले आहे. त्यामुळे शेतकरी फळबाग म्हणून चिंचेच्या लागवडीकडे वळला आहे. यातून ग्रामीण भागात उन्हाळ्यात घरी बसून महिलांना चिंच फोडण्यापासून ते चिंच बाजारात येईपर्यंत अनेकांच्या हाताला राेजगार मिळत असल्याने शेतकरीही याकडे चांगले उत्पादन हाेणारे फळ म्हणून पाहत आहेत. यंदा निसर्गाने साथ दिल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शनिवारी उदगीरच्या बाजारात ७ हजारांपासून १५ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल चिंचेला दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. सध्या ४०० ते ६०० क्विंटलची आवक झाली आहे.
आवक वाढल्यास दरात हाेईल घसरण...
उदगीरच्या बाजारातून आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चिंच जात आहे. मागील वर्षी लॉकडाऊन आणि उत्पादन घटल्याने प्रतिक्विंटलला १२ ते २० हजार रुपयांचा दर हाेता. मात्र, यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने ७ ते १२ हजारांचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. आगामी काळात आवक वाढल्यास दरात आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- नरसिंग रामासाने, चिंचेचे व्यापारी, उदगीर