कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:14+5:302021-05-27T04:21:14+5:30
चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र ...

कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना आधार
चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र गमावले आहे. या बालकांचे पालकत्व राज्याचा महिला व बालकल्याण विभाग घेणार आहे. चाकूर तालुक्यात अशा १८ बालकांची नोंद झाली असून, सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
बालकांना पालकांच्या आधाराची गरज असते. कोरोनामुळे उपचार घेताना काही बालकांची आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला. तसेच आई आणि वडील अशा दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परस्थितीत मुलांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाहासाठी शासन त्यांचे पालकत्व घेऊन आवश्यक ती मदत करणार आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना शासन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचा शोध आरोग्य विभाग व तालुकास्तरीय यंत्रणेमार्फत घेतला जात आहे.
बाल संगोपन योजनेंतर्गत कोणत्याही कारणाने आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना आता दरमहा ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. आतापर्यंत ही मदत ४२५ रुपये अशी होती. मात्र, शासनाने त्या रकमेत वाढ केली आहे. दुर्धर आजार अथवा कैदी, विधवा महिलांच्या १८ वर्षांखालील मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
आई अथवा वडील गमावलेल्या मुलांचा सांभाळ करण्यास इतर नातेवाईक तयार असतील तर त्यांच्या रेशनसाठी विशिष्ट रक्कम दिली जाणार आहे. तसेच पालक नसल्यास त्यांची बालगृहात व्यवस्था केली जाणार आहे. ० ते ६ वयोगटातील अनाथ बालकांना शिशुगृहात ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर अनेकदा मालमत्तेचे वाद निर्माण होतात. या वादांचे निराकरण करण्याचे कामही या विभागाकडून होणार आहे.
कोरोनामुळे काही मुलांचे मायेचे छत्र हरवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्यात आले आहे. अध्यक्षपद हे जिल्हाधिकाऱ्यांकडे असून सदस्य म्हणून बालविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे कृती दल दर १५ दिवसांनी बैठक घेऊन मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या कामाचा आढावा घेणार आहे.
संख्या वाढण्याची शक्यता...
कोरोनाने मृत्यू होणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार अशा मुलांचा शोध घेतला जात आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत अशा कुटुंबांचा सर्व्हे केला जात आहे. त्यामुळे संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे चाकूरच्या महिला व बाल प्रकल्पाच्या विस्तार अधिकारी अर्चना कलशेट्टी यांनी सांगितले.