उदगीरच्या फळबाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:20+5:302021-03-16T04:20:20+5:30

उदगीर : येथील फळबाजारात वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळांची आवक माेठ्या प्रमाणावर होत आहे. शरिरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाटी नागरिक ...

Summer fruit arrivals increased in Udgir fruit market | उदगीरच्या फळबाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली

उदगीरच्या फळबाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली

उदगीर : येथील फळबाजारात वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळांची आवक माेठ्या प्रमाणावर होत आहे. शरिरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाटी नागरिक खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रा, अननस या फळांना प्राधान्य देत आहत. या फळांच्या सेवनाने नागरिक शरिरात असलेली उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

उदगीर शहरातील भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालयासमोर भरणारा बाजार, छत्रपती शाहू महाराज चौक, कॅप्टन चौक, बसस्थानक, उमा चौक येथील व्यापारी आणि इतर फेरीवाले केवळ कलिंगड, खरबूज, चिकू, द्राक्षे, काकडी याचा व्यवसाय करु लागले आहेत. उदगीरात मार्च, एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हाचे चटके बसतात. या कडक उन्हाळी वातावरणात शरिरातील पाणीदेखील कमी होऊ लागते. यावर उपाय म्हणून पाणीदार फळांचे सेवन करण्यात येते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीदार फळांची आवक होत आहे. १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंतचे खरबूज बाजारात आले आहे. कलिंगड १० रुपयांपासून ते १००, द्राक्षाची ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे व्यापारी हामेद चौधरी यांनी सांगितले. तसेच मोसंबी, संत्र्याची आवकही चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली. उदगीर तहसील कार्यालयासमोर शेतकरी स्वतःच्या वाहनातून कलिंगड, खरबूज आणून त्याची विक्री करत आहेत.

उदगीर तालुक्यातील तोंडार, हैबतपूर गावातून शेतकरी त्यांचा माल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. उदगीर शहरातील बसस्थानक, देगलूर रोड, शिवाजी चौक, उमा चौक, बिदर रोड आदी मार्गांवर खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रे आणि अननस विक्रीसाठी हातगाडे लागले आहेत. फळ विक्रेत्यांकडून पाणीदार फळांची ग्राहक खरेदी करत आहेत. उन्हातून आल्यानंतर पालकही आपल्या मुलांना चविष्ट पाणीदार फळे खाण्यास देत आहेत. त्यामध्ये अननस, खरबूज, कलिंगड, मोसंबी, संत्रे आदी फळे लहान मुलांना दिली जात आहेत.

ज्यूस सेंटर, आईस्क्रीम गाड्यांवर गर्दी...

उदगीर शहरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ज्यूस सेंटर आणि आईस्क्रीमच्या गाड्यांवर ग्राहकांची गर्दी हाेत आहे. गरिबांचा फ्रिज असलेल्या माठाचे महत्त्वही आता वाढले आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्यामुळे शरिरातील उष्णता कमी होण्याला मदत होते. शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानासमोर आणि पोलीस ठाणे, संत गाडगेबाबा चौक येथे माठ विक्रीसाठी दुकाने लागली आहेत. ५० ते १५० रुपयांपर्यंत माठ उपलब्ध आहेत. फ्रिजमधील पाणी थंड करुन पिण्यापेक्षा माठातील पाणी पिणे अधिक चांगले असल्याचे नागरिकांचे मत आहे. आता माठाला प्लास्टिकचे नळ बसविण्यात आले आहेत.

Web Title: Summer fruit arrivals increased in Udgir fruit market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.