अचानक वीज आली अन् अनर्थ झाला; कुलर बसवताना विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू
By राजन मगरुळकर | Updated: April 17, 2023 18:05 IST2023-04-17T18:04:37+5:302023-04-17T18:05:03+5:30
परभणी शहरातील रामकृष्ण नगर भागातील घटना

अचानक वीज आली अन् अनर्थ झाला; कुलर बसवताना विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू
परभणी : कुलरचे काम करत असताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना परभणी शहरातील रामकृष्ण नगर भागात सोमवारी दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संभाजी अशोक थोरे (२३, रा.रामकृष्ण नगर) आणि रोहित शिवाजी उमरीकर (२२, रा.रामकृष्ण नगर) हे दोघे रामकृष्ण नगर भागातील एका घरामध्ये कुलर बसविण्याचे काम करीत होते. त्यावेळी विजेचा दाब कमी अधिक होत असल्याने व वीजपुरवठा सतत खंडित होत असताना अचानक संभाजी थोरे यास विजेचा जोरदार धक्का लागला. संभाजी थोरे याला वाचविण्यासाठी गेलेला रोहित उमरीकर यालाही विजेचा धक्का बसला.
यानंतर दोन्ही युवकांना वसमत रोडवरील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. यानंतर सदरील दोघांचे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.