बहिणीच्या प्रोत्साहनामुळे यूपीएससीत भरारी! चाटेवाडीच्या सुशील गीत्ते यांचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 23:44 IST2025-04-22T23:43:46+5:302025-04-22T23:44:05+5:30

...मात्र, तिसऱ्या वेळेस यशोशिखर गाठत ध्येयाला गवसणी घातली असल्याचे जळकोट तालुक्यातील चाटेवाडीच्या सुशील सूर्यकांत गीत्ते यांनी सांगितले.

Success in UPSC due to sister's encouragement Chatewadi's Sushil Geette's success | बहिणीच्या प्रोत्साहनामुळे यूपीएससीत भरारी! चाटेवाडीच्या सुशील गीत्ते यांचे यश

बहिणीच्या प्रोत्साहनामुळे यूपीएससीत भरारी! चाटेवाडीच्या सुशील गीत्ते यांचे यश

लातूर : एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर आरोग्य सेवेत उतरायचे की प्रशासनात काम करायचे, अशी द्विधा मनस्थिती होती. तेव्हा जिल्हाधिकारी असलेल्या बहिणीने प्रोत्साहन दिले. त्यामुळे यूपीएससीची तयारी सुरु केली. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांना यश आले नाही. मात्र, तिसऱ्या वेळेस यशोशिखर गाठत ध्येयाला गवसणी घातली असल्याचे जळकोट तालुक्यातील चाटेवाडीच्या सुशील सूर्यकांत गीत्ते यांनी सांगितले.

जिल्ह्यातील चाटेवाडी येथील सुशील गीत्ते यांचे वडील सूर्यकांत गीत्ते हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक आहेत. आई गृहिणी आहे. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांचा थोरला भाऊ सुमित हे इंजिनिअर आहेत तर बहीण स्नेहा ह्या गोवा येथे जिल्हाधिकारी आहेत. सुशील गीत्ते यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथील सेंट ॲनस इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण लातुरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात पूर्ण झाले. नीट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने सन २०२० मध्ये एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण झाले. तेव्हा आरोग्य क्षेत्रात उतरायचे की यूपीएससीची तयारी करायची असा मनामध्ये प्रश्न निर्माण झाला.

तेव्हा जिल्हाधिकारी असलेल्या बहिणीने प्रोत्साहन दिले आणि यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. तिथे वर्षभर तयारी केली. त्यानंतर गावी परतून घरीच राहून तयारी केली. त्यात यश मिळाले असून, ६२३ वी रँक मिळाली आहे.

सेवेसाठी यूपीएससीत उतरलो...
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याने आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करता येते. मात्र, ती मर्यादित राहते. समाजातील सर्व घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी यूपीएससीची तयारी सुरु केली. त्यासाठी बहीण स्नेहा हिने प्रोत्साहन दिले. त्यामुळे हे यश मिळविता आले. - सुशील गीत्ते, चाटेवाडी.

Web Title: Success in UPSC due to sister's encouragement Chatewadi's Sushil Geette's success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.