पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लागली शाळेची ओढ; पालक मात्र संभ्रमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:18+5:302021-02-13T04:19:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यात ५ वी ते १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. मात्र १ ली ...

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लागली शाळेची ओढ; पालक मात्र संभ्रमात !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात ५ वी ते १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. मात्र १ ली ते ४ थीच्या वर्गांना शिक्षण विभागाने हिरवा कंदिल दिलेला नाही. त्यामुळे प्राथमिक शाळेतील किलबिलाट सध्या बंद आहे. दरम्यान, प्राथमिकची मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली असून, पालक मात्र आपल्या पाल्यास शाळेत पाठवावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहेत.
जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या १ हजार ७ शाळा आहेत. यामध्ये पहिली वर्गात ४६ हजार ७७८, दुसरी ४६ हजार ७३३, तिसरी ४६ हजार ६२१, तर चौथीच्या वर्गात ४७ हजार ६९९ असे एकूण १ लाख ८७ हजार ८३१ विद्यार्थी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी होत असली तरी गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली आहे. अद्याप १ ली ते ४ थीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय झाला नसला तरी पालक मात्र संभ्रमात आहेत.
गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेत जाण्याची आतुरता लागली आहे. मात्र कोरोनामुळे घरच्या घरीच अभ्यास करावा लागत आहे.
- आक्सा पठाण, विद्यार्थिनी
ऑनलाईनद्वारे शिकवणी होत आहे. अंगणवाडीनंतर पहिल्या वर्गात प्रवेश झाला तरी नव्या वर्गातील मित्रांची भेट झालेली नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा आहे.
- मानसी महामुनी, विद्यार्थिनी
लाॅकडाऊनपासून शाळा बंद आहेत. घरीच ऑनलाईन अभ्यास करावा लागतो. मित्रांचीही अनेक दिवसांची भेट नाही. त्यामुळे शाळेत जाण्याची ओढ असून, दिवसभर घरीच राहून कंटाळा आला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांच्या संमतीने नियमित शाळेत जाणार आहे. - रुद्र आलमले, विद्यार्थी
शाळा बंद असल्याने मैदानी खेळांचा आनंद घेता आला नाही. दिवसभर घरी राहूनच ऑनलाईन अभ्यास करावा लागला. मित्रांशी फोनद्वारे संवाद साधावा लागत आहे. अभ्यासातील अडचणीही सोडविण्यासाठी गैरसोय होत आहे. शाळा सुरू झाल्यास नियमित मैदानी खेळ खेळता येतील.
- ध्रुव बिराजदार
विद्यार्थी