राजकुमार जाेंधळे, लातूर: जिल्ह्यात रविवारी हाेत असलेली नीट परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी लातूर पाेलिस दलाच्या वतीने तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पाच उपविभागीय पोलिस अधिकारी, ६० पोलिस अधिकारी, ३९१ पोलिस अमलदार आणि ३०० होमगार्डचा फाैजफाटा बंदाेबस्तावर राहणार आहे.
लातूर जिल्ह्यात २० हजार ८०१ विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जात आहेत. लातूर जिल्ह्यात ५१ केंद्रांवर परीक्षा होत आहे. एकाच सत्रात रविवार, ४ मे रोजी दुपारी होणाऱ्या या परीक्षेसाठी केंद्रावर आधीच बायोमेट्रिक हजेरीसाठी पोहोचावे लागणार आहे. दरम्यान, सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलिस अधिकारी, इतर पोलिस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात केला आहे. परीक्षा केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असून, परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लातूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे, अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिली.