आठ एकरावरील सोयाबीनची बनीम अज्ञाताने पेटविली; शेतकऱ्याचे ६ लाखांचे नुकसान
By हरी मोकाशे | Updated: October 20, 2022 18:15 IST2022-10-20T18:09:40+5:302022-10-20T18:15:24+5:30
सध्या पीक परिपक्व झाल्याने राशी करण्यासाठी त्याची काढणी करुन शेतात बनीम रचली होती.

आठ एकरावरील सोयाबीनची बनीम अज्ञाताने पेटविली; शेतकऱ्याचे ६ लाखांचे नुकसान
येरोळ (जि. लातूर) : सतत पाऊस होत असल्याने खरीपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील एका शेतकऱ्याने ८ एकरवरील सोयाबीनची काढणी करुन बनीम रचली होती. ती अज्ञाताने बुधवारी रात्री पेटवून दिली. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुमठाणा येथील शेतकरी जर्नादन माने यांची सर्व्हे क्र. ८८ मध्ये तीन हेक्टर शेती आहे. त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. सध्या पीक परिपक्व झाल्याने राशी करण्यासाठी त्याची काढणी करुन शेतात बनीम रचली होती. बुधवारी रात्री अज्ञातांनी ही बनीम पेटवून दिली. यात या शेतकऱ्याचे जवळपास ६ लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शेतकरी माने यांनी तहसीलदार, पोलीस ठाणे आणि पीकविमा कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बनीम पेटविणाऱ्या अज्ञाताचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.