राज्य बेसबॉल स्पर्धा: मुलांत नाशिक, मुलींत बीड जिल्हा संघ अजिंक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 18:32 IST2024-02-05T18:31:21+5:302024-02-05T18:32:14+5:30
यजमान लातूरच्या मुलींचा संघ तृतीय

राज्य बेसबॉल स्पर्धा: मुलांत नाशिक, मुलींत बीड जिल्हा संघ अजिंक्य
- महेश पाळणे
लातूृर : जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पर्धेत शेवटच्या दिवशी नाशिक संघाने कोल्हापूरवर मात करीत मुलांच्या गटात बाजी मारली. तर मुलींच्या गटात बीडच्या संघाने भंडाऱ्याचा पराभव करीत विजेतेपद खेचले. यजमान लातूरचा मुलींचा संघ मात्र तृतीय स्थानावर राहिला.
महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन व हौशी बेसबॉल असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात नाशिकने कोल्हापूरचा १२-५ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तृतीय स्थानाच्या सामन्यात सोलापूरने साताऱ्याचा ८ धावांनी पराभव करीत कांस्यपदक पटकाविले. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात बीडने अटीतटीच्या लढतीत अवघ्या तीन धावांनी भंडाऱ्याचा पराभव करीत बाजी मारली. तृतीयस्थानाच्या सामन्यात यजमान लातूर संघाने जळगावचा ११-१ असा दहा धावांनी धुव्वा उडवीत कांस्यपदक पटकाविले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सचिन हणमंते, दैवशाला जगदाळे, राजेश देवकर, शिवानंद मिटकरी यांच्यासह हौशी बेसबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विजेत्या खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सन्मान...
स्पर्धेतील मुला-मुलींच्या गटातील विजेत्या-उपविजेत्या व तृतीय स्थान पटकाविलेल्या संघाला देशिकेंद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री ढवळे, राज्य बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा हौशी बेसबॉल असोसिएशनचे सचिव रवींद्र गुडे, राजेंद्र बनसोडे, संतोष खेंडे, आनंदा कोवळे, हरिशा डोणगावकर, सुखदेवे यांची उपस्थिती होती.