तेल अन् पेंढीचे भाव वधारल्याने सोयाबीन तेजीत; माल राखून ठेवलेले शेतकरी फायद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 15:39 IST2021-02-26T15:37:44+5:302021-02-26T15:39:32+5:30
चांगला आणि नगदी दाम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव केंद्राची वाट धरलीच नाही.

तेल अन् पेंढीचे भाव वधारल्याने सोयाबीन तेजीत; माल राखून ठेवलेले शेतकरी फायद्यात
लातूर : तेल आणि डीओसीचे भाव वधारल्यामुळे सोयाबीन तेजीत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी भाव मिळेल म्हणून सोयाबीन ठेवले होते, त्यांना याचा फायदा होत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये १४ हजार ४५६ क्विंटलची आवक असून, सर्वसाधारण दर ५ हजार २० रुपये, किमान ४ हजार ६५०, तर कमाल ५ हजार ११३ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हमी भावापेक्षा किती तरी चांगला दर मार्केट यार्डात मिळत आहे. त्यामुळे यंदा हमीभाव केंद्र ओस पडली आहेत.
सर्वच शेतकरी मार्केट यार्डात सोयाबीनची विक्री करीत आहेत. दर चांगला आणि नगदी दाम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव केंद्राची वाट धरलीच नाही. गेल्या आठ - दहा दिवसांपासून सोयाबीनला हा दर मिळत आहे. रब्बी पेरणीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आवक होती. त्यावेळी ४ हजार ३०० पर्यंत दर मिळाला होता. आता सौद्यात ५ हजार १०० रुपये दर मिळत आहे. पोटलीमध्ये ४ हजार ९६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
बाजारात तेलाचे भाव वधारले आहेत. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर ११ हजार रुपये क्विंटल होता. सध्या ११ हजार २१० क्विंटलपर्यंत हे दर गेले आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याचे व्यापारी पांडुरंग मुंदडा यांनी सांगितले. पेंढीचाही दर चांगला झाला आहे. त्याचाही फायदा सोयाबीनचा दर वाढण्यात होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे, त्यांना सध्या चांगला फायदा होत आहे.