शिरूर अनंतपाळ तालुक्यात १०५ टक्के क्षेत्रावर पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:40+5:302020-12-29T04:18:40+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा रबी हंगामातील हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. १४ हजार ८७८ हेक्टर्सवर ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात १०५ टक्के क्षेत्रावर पेरा
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा रबी हंगामातील हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. १४ हजार ८७८ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात रबी हंगामाचे नियोजित क्षेत्र ११ हजार ८०० हेक्टर्स आहे; परंतु ऑक्टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील प्रकल्प भरले. तसेच विहिरी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे तालुक्यात रबी हंगामाचा पेरा वाढला. १८ हजार ५७२ हेक्टर्सवर रबीतील विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यातील १४ हजार ८७८ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
मागील दोन-तीन वर्षांत तालुक्यातील पर्जन्यमान घटले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तुरीऐवजी सोयाबीनचा पेरा केला होता; परंतु यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचे सोयाबीन वाहून गेले. त्यामुळे रबीच्या क्षेत्रात वाढ झाली असून, हरभऱ्याचा पेरा वाढला आहे.
अळीचा प्रादुर्भावामुळे चिंता
हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असले तरी सध्या हरभऱ्यावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे रमेश पाटील, सिद्धार्थ स्वामी, संतोष पाटील, डॉ. बालाजी बिरादार, मेजर दिलीप बिरादार यांनी सांगितले.
***