निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तहसील कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:45+5:302021-07-29T04:20:45+5:30
लातूर : अपारंपरिक ऊर्जा विकास माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत करण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. त्या अनुषंगाने ...

निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तहसील कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार
लातूर : अपारंपरिक ऊर्जा विकास माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत करण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. त्या अनुषंगाने माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदार संघातील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प उभारला जावा, याकरिता प्रस्ताव दाखल केलेला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून, लवकरच या तिन्ही तहसील कार्यालयांत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अपारंपरिक ऊर्जा विकास या माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता २ कोटी ४६ लाख २८ हजार रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. या निधीच्या माध्यमातून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदार संघातील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या तहसील कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प उभारला जावा, यासाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, या तिन्ही ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता १३ लाख ९८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. निधी मंजूर झाल्याने लवकरच तिन्ही तहसील कार्यालयांत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. हे सौरऊर्जा प्रकल्प १० किलोवॅट क्षमतेचे असणार आहेत. पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प उभारले जावेत, याकरिता सातत्याने पुढाकार घेतलेला होता. यासाठी आवश्यक असणारा निधीही शासनाकडून मिळवला आहे. यामुळे शासकीय कार्यालयांना येणाऱ्या विद्युत देयकांच्या रकमेमध्ये बचत होणार आहे. आमदार निलंगेकर यांनी या तिन्ही तालुक्यांच्या पंचायत समितीच्या कार्यालयातही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता निधीचा प्रस्ताव दाखल केलेला असून, हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन पंचायत समिती कार्यालयामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
विद्युत देयकात होणार बचत...
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सौरऊर्जा प्रकल्प व पाणी पुरवठा यंत्रणेवर सौरपंप बसविले जावेत, याकरिता सूचना केलेल्या होत्या. अपारंपरिक ऊर्जा विकासच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये निधीची तरतूद करावी, अशी सूचना केलेली होती. त्यानुसार निधीची तरतूद करण्यात आली असून, या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प व सर्व ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेवर सोलार पंप बसविले जावेत याकरिता वर्षभरापासून पाठपुरावा सुरु आहे. आमदार निलंगेकर यांच्या प्रयत्नांमुळे विद्युत देयकात बचत होऊन बचत झालेली रक्कम विकासकामांवर खर्च करता येणार आहे.
- संजय दोरवे, जिल्हा परिषद सदस्य, लातूर