खरोसा लेणीतील सौरदिवे, फलक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:32+5:302021-01-18T04:17:32+5:30
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा हे गाव प्राचीन लेण्यांमुळे ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे. येथील शासनाने लावलेले ...

खरोसा लेणीतील सौरदिवे, फलक गायब
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा हे गाव प्राचीन लेण्यांमुळे ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे. येथील शासनाने लावलेले फलक तसेच सौरदिवे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
औसा तालुक्यातील खरोसा हे छोटेसे गाव असले तरी येथे प्राचीन लेणी आहेत. त्यामुळे गावची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. येथे दोन मजली पश्चिम मुखी २१ लेणी आहेत. ती लेणी पाहण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातीलही पर्यटक, शाळेच्या सहली वर्षभर येतात. त्यामुळे हा परिसर नेहमी गजबलेला असतो. येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन व्हावे तसेच लेणी स्पष्टपणे दिसाव्यात म्हणून राज्य शासनाने लेणी परिसरात सौर दिवे बसविले होते. परंतु, सध्या हे दिवे गायब झाले आहेत.
तसेच लेण्यांची कोणीही नासधूस करू नये म्हणून शासनाच्या अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा फलक डकविण्यात आला होता. परंतु, तो फलकही गायब झाला आहे. तसेच लेण्यांमध्ये जनावरे फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर काही मद्यपींसाठी हे आश्रयस्थान बनले आहे. त्यातच आता काही जुगारी राजरोसपणे पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी शासनाचा कर्मचारी नसल्याने दुरवस्था होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन देखभालीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.
ऐतिहासिक ठेवा जतन करावा...
खरोसा येथील लेणी हा ऐतिहासिक ठेवा आहे. परंतु, त्याचे जतन होण्याऐवजी काही विघ्नसंतोषींकडून नासधूस केली जात आहे. पुराणातील देव- देवतांचे प्रसंगवर्णन केलेले दुर्मीळ शिल्पं बोथट होत आहेत. ही लेणी इ. स. ६व्या शतकातील असावीत, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच येथील दगड ठिसूळ असल्यामुळेही पाऊस, वाऱ्यामुळेही त्याची झीज होत असावी, असे सांगण्यात येत आहे. शासनाने देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे.