तेरणावरील ६ उच्चस्तरीय बंधारे ८५ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:28+5:302021-07-11T04:15:28+5:30
औराद शहाजानी (जि. लातूर) : जिल्ह्यातील बहुतांश भागात दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ...

तेरणावरील ६ उच्चस्तरीय बंधारे ८५ टक्के भरले
औराद शहाजानी (जि. लातूर) : जिल्ह्यातील बहुतांश भागात दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा नदीवरील ७ पैकी ६ उच्चस्तरीय बंधारे ८५ टक्के भरल्याने सिंचन विभागाने अतिरिक्त पाणी शनिवारी सोडून दिले आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात एका महिन्यात २७७ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी २५२.८ मि.मी. पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात २४०.५ मि.मी., औसा- २५६.८ मि.मी., अहमदपूर- २६६.४ मि.मी., निलंगा- २३५.५, उदगीर- ३२५.६, चाकूर- २५८.६, रेणापूर- २५३.१, देवणी-२५०.० शिरुर अनंतपाळ- २२६.२ आणि जळकोट तालुक्यात ३२२.० मि.मी. पाऊस झाला आहे.
औराद शहाजानी व परिसरात शनिवारी ५१.४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे तेरणा नदी वाहती झाली आहे. नदीवरील मदनसुरी उच्चस्तरीय बंधाऱ्यात १.४८३ दलघमी, गुंजरगा- १.१५१, औराद शहाजानी- ३.१५१, तगरखेड- ०.६७०, किल्लारी-२- १.३०४, लिंबाळा- ०.२८३ आणि राजेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यात ०.५८७ दलघमी उपलब्ध साठा झाला आहे. या बंधाऱ्यांत ८५ टक्के जलसाठा ठेवून अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले आहे, तसेच मांजरा नदीवरील होसूरच्या उच्चस्तरीय बंधाऱ्यात १.४८३ दलघमी उपलब्ध जलसाठा आहे, अशी माहिती जलसिंचन विभागाचे शाखा अभियंता एस. आर. मुळे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर असून आतापर्यंत ४ लाख ६९ हजार ७४६ हेक्टरवर पेरा झाला आहे. दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे उगवलेल्या कोवळ्या पिकांना आधार मिळाला आहे, तसेच शिल्लक राहिलेल्या पेरणीस वेग येत आहे.
सोबत फोटो...
फोटो फाईल नेम : १०एलएचपी औराद शहाजानी
कॅप्शन : निलंगा तालुक्यातून वाहणाऱ्या तेरणा नदीवरील गुंजरगा येथील उच्चस्तरीय बंधाऱ्यात ८५ टक्के जलसाठा ठेवून अतिरिक्त पाणी सोडून देण्यात येत आहे.