जिल्ह्यात 'सिंघम' अवतरणार ; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:55+5:302021-05-23T04:18:55+5:30

लातूर : कोणत्याही ठिकाणी अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी, पोलीस प्रशासनातर्फे लवकरच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येत ...

'Singham' to appear in the district; Tenth minute police will get help! | जिल्ह्यात 'सिंघम' अवतरणार ; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार !

जिल्ह्यात 'सिंघम' अवतरणार ; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार !

लातूर : कोणत्याही ठिकाणी अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी, पोलीस प्रशासनातर्फे लवकरच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येत आहे. ११२ नंबर डायल केल्यास दहाव्या मिनिटाला पोलीस हजर होणार आहेत. यासाठी हायटेक यंत्रणा उभारली असून लातूर पोलीस दलात २८ चारचाकी तर ५१ दूचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत.

कोरोना काळातही कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गरजूंना तत्काळ मदत मिळावी म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावताना दिसत आहेत. यातून कोरोनाला आळा बसण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांना पोलीस आपलेसे वाटत आहेत. सध्या कोरोनामुळे संचारबंदी असल्याने गुन्हे कमी झाल्याचे दिसत आहेत. मात्र तरीही इतर घटना घडत आहेत. यात अनेेकवेळा अपघातग्रस्त, पिडीत महिला, नागरिकांना तत्काळ मदत मिळण्यास वेळ जात होता. परंतु, आता पोलीस प्रशासन आणखी गतीमान झाले असून, तत्काळ मदत मिळावी म्हणून हायटेक यंत्रणा उभारली आहे. यासाठी ११२ हा आपत्कालीन क्रमांक सुरू केला आहे. लवकरच ही सेवा सुरू होणार असून काही वेळातच पोलीस मदतीसाठी उपलब्ध होणार आहेत.

कॉल येताच लोकेशन कळणार...

अडचणीत सापडलेल्या नागरिक, पिडीतांनी त्यांच्या मोबाईलवरून ११२ हा नंबर डायल केल्यास त्यांच्या मोबाईलवरून सध्या पिडीत कुठे आहे. कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, पोलीस ठाणे हद्दीत आहे. याची माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे. त्यावरून पोलीस लगेच दाखल होणार असून मदत करणार आहेत.

पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा...

अडचणीत सापडलेल्या कुणालाही पोलीस मदत हवी असल्यास ११२ हा आपत्कालीन नंबर डायल करावा लागणार आहे. या नंबरवरून मदत मागितल्यास जास्तीत जास्त दहा मिनिटांपर्यंत पोलीस पोहचणार आहेत. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रशिक्षित पोलीस कर्मचारी असणार आहेत. वेळीच मदत मिळणार असल्याने अनुचित घटना टळण्यास मदत होणार आहे.

२८ चारचाकी, ५१ दुचाकी...

आपत्कालीन परिस्थितीत वेळीच मदत मिळावी यासाठी ११२ क्रमांकाच्या लातूर पोलीस दलास २८ चारचाकी आणि ५१ दुचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात २३ पोलीस ठाणे असून, १०९ पोलीस अधिकारी आणि १८४४ पोलीस अंमलदार कार्यरत आहे. या योजनेसाठी विशेष कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

३६ कर्मचा-यांना प्रशिक्षण...

११२ क्रमांकाच्या यंत्रणेसाठी जिल्ह्यात ३६ कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, आठ आठवडे प्रशिक्षण चालणार आहे. या सुविधेमुळे गरजूंना तात्काळ पोलीसांची मदत मिळणार आहे.

११२ क्रमांकाची हायटेक यंत्रणा असून, यामुळे गरजू व्यक्तीला दहा मिनिटात मदत मिळणार आहे. सर्वच वाहनांना जीपीएस यंत्रणा कार्यान्वित राहणार असून, ११२ क्रमांकांवर संपर्क साधल्यास संबधिताचे तात्काळ लोकेशन कळणार आहे. जिल्ह्यात ३६ जणांचे प्रशिक्षण सुरु आहे. - निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक

Web Title: 'Singham' to appear in the district; Tenth minute police will get help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.