खळबळजनक! प्रवास्याच्या खिशातील पैसे, मोबाईल काढून घेऊन धावत्या ऑटोतून ढकलले
By हरी मोकाशे | Updated: May 29, 2023 18:44 IST2023-05-29T18:35:22+5:302023-05-29T18:44:24+5:30
ऑटोचालकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात्त आला आहे

खळबळजनक! प्रवास्याच्या खिशातील पैसे, मोबाईल काढून घेऊन धावत्या ऑटोतून ढकलले
लातूर : भावाकडे जाण्यासाठी ऑटोमध्ये बसलेल्या एकास मारहाण करीत खंडापूर शिवारात नेऊन रोख तीन हजार, मोबाईल काढून घेत धावत्या ऑटोमधून ढकलून दिल्याची घटना लातूरनजिक घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ऑटोचालकासह अन्य दोघांविरुध्द रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरनजिकच्या वसवाडी येथील शिवानंद दिलीप कोेरे हा भावाकडे जाण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शनिवारी एका ऑटोमध्ये बसला होता. तेव्हा ऑटोचालकासह अन्य दोघांनी संगनमत केले. त्यांनी कोरे यास धावत्या ऑटोमध्येच शिवीगाळ करुन चापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. शहरानजिकच्या खंडापूर शिवारात घेऊन जाऊन फिर्यादी कोरे याच्या खिशातील मोबाईल, पॉकेट आणि पॉकेटमधील रोख ३ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत धावत्या ऑटोमधून ढकलून दिले. त्यात तो जखमी झाला. याप्रकरणी शिवानंद कोरे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी ऑटोचालक व अन्य दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि. मोरे हे करीत आहेत.